आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • OBC Leadership To Pankaja, Amit Shah Announced At Bhagwangad

पंकजांकडे ओबीसींचे नेतृत्व, भगवानगडावर अमित शहा यांची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - राज्यातील ओबीसी लोकांचे भगवानगड प्रेरणास्थान आहे. गोपीनाथ मुंडे यांनी येथूनच संघटनाचे कार्य केले. आमदार पंकजा मुंडे यांचे नेतृत्व मजबूत करण्यासाठी ओबीसींची ताकद त्यांच्या मागे उभी करण्यासाठी भगवानगडाला ओबीसींचे ऊर्जाकेंद्र बनवा, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी केले.

श्रीक्षेत्र भगवानगडावर मुंडे यांच्या पुढाकाराने सुरू झालेला दसरा मेळावा या वर्षी पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन करीत पंकजांना मुख्यमंत्री करा या मागणीसाठी यशस्वी करून दाखवला. समर्थकांनी मेळाव्यात गर्दी करून येथील गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडले. या वेळी व्यासपीठावर गुजरातचे मंत्री शंकरभाई चौधरी, खासदार दिलीप गांधी, एकनाथ खडसे, भगवानगडाचे सचिव गोविंद घोळवे, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर, आमदार शिवाजी कर्डिले, राम शिंदे, विनायक मेटे, बीड लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार डॉ. प्रीतम खाडे, शेवगाव मतदारसंघातील उमेदवार मोनिका राजळे, पंकजा यांचे पती अमित पालवे आदी उपस्थित होते.
गडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री अध्यक्षस्थानी होते. शहा भाषणाला उभे राहताच फलक दाखवले गेले. एक फलक तर शहा यांनी भाषण थांबवून वाचला. हे पाहून शहा यांनीही परिस्थितीचे भान राखत मुख्यमंत्री पदासारख्या संवेदनक्षम मुद्यावर थेट व स्पष्ट बोलणे टाळले. चौंडीच्या सभेतील भाषणाचा पुनरूच्चार त्यांनी पंकजाच्या बाबतीत केला. सहा जानेवारी रोजी भगवान बाबांच्या समाधी सोहळ्याच्या सुवर्णमहोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भगवान गडावर आणण्याचे आश्वासन देत गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. हेलीकॉप्टरमधून गर्दी पहाण्याची केलेली पंकजांची विनंती शहा यांनी मान्य केली.
उत्साही कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्यावर व्यासपीठावरून पंकजा यांनी बाबांच्या भक्तांना न मारण्याविषयी सूचना दिली. गडाचे विश्वस्त गोविंद घोळवे यांनीही पंकजाला राज्यात संधी द्या, अशी मागणी केली. गडावरील मुंडेंच्या शेवटच्या भाषणाची चित्रफीत ऐकताना निरव शांतता पसरून अनेकांनी अश्रुंना मोकळी वाट करून दिली.

मुंडे नाव जगाला विसरू देणार नाही
माझी लढाई कुठल्या पक्षाशी, थातूरमातूर नेत्याशी नाही. कोणत्याही पदात मला स्वारस्य नाही. सत्तेचा कळस कुणीही व्हा, पायाचा दगड मी राहणार आहे. बुद्धिबळाच्या पटावरील हत्ती मी होणार आहे. मुंडे हे नाव जगाला विसरू देणार नाही. धर्मयुद्धाच्या लढाईचे सारथ्य आपण करणार आहोत, असे पंकजा म्हणाल्या.

मुंडेंनी केलेले कार्य महान
^ओबीसींचा नेता म्हणून मुंडे यांनी केलेले कार्य महान आहे. वनविभागाची १५ एकर जमीन गडाकडे वर्ग करण्यासाठी शहा यांनी मदत करावी.
एकनाथ खडसे, माजी विरोधी पक्षनेते.

पंकजा भगवानगडाची मुलगी
भगवानगड हा राज्याच्या गुरू आहे. अमित भाईंनी पंकजासाठी आदेश द्यावेत. जास्तीत जास्त अपेक्षा पूर्ण होतील पंकजा भगवानगडाची मुलगी आहे, ती तुमच्या पदरात टाकली तिला सांभाळा, मोठे करा, सुखी करा, पित्यांची दुसरी अपेक्षा नाही..
डॉ. नामदेव शास्त्री, महंत.

पंकजामध्ये राज्य नेतृत्व गुण
पंकजा यांना नेतृत्वाची संधी द्या, राज्यात आपोआप बदल होईल. पंकजाच्या रुपाने ५२ टक्के ओबीसींना राज्याच्या नेतृत्वाची संधी द्या.
महादेव जानकर, अध्यक्ष, रा.स.प.

विष पेरणा-यांना कृतीतून उत्तर देऊ
गोपीनाथ मुंडे यांना गडावरून दिल्ली लोकसभा दिसायची, आता पंकजा यांना मुंबई (मुख्यमंत्री)दाखवा.
विनायक मेटे, संस्थापक, शिवसंग्राम पक्ष.