आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Objection On Political Reservation To Maratha Community, Gopinath Munde

मराठ्यांच्या राजकीय आरक्षणास विरोधच, गोपीनाथ मुंडे यांचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - ओबीसींना धक्का लागणार नाही असे मराठा समाजाला आरक्षण द्यावे. राजकीय आरक्षणाला आपला आक्षेप कायम असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी भगवान गडावर भगवानबाबांच्या 49 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित मेळाव्यात शुक्रवारी सांगितले.
मुंडे म्हणाले, आगामी निवडणुकीत आमचीच सत्ता येणार असून समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा व आरक्षणाचा प्रश्न आम्हीच मार्गी लावू. शिक्षण व नोकरीतील आरक्षणाला आपला पाठिंबा असला तरी राजकीय आरक्षणाला मात्र आक्षेप कायम आहे. छत्रपतींच्या नावाने राजकारण करणा-यांना छत्रपतींचा फोटो मंत्रालयात लावण्याचे भान नव्हते. गेल्या तीन निवडणुकांपासून सरकार छत्रपतींच्या स्मारकाबाबत जनतेला झुलवत आहे. जिजाऊंच्या स्मारकाचाही निर्णय आमच्याच काळातील आहे. मराठा समाजाला आरक्षण फक्त आम्हीच देऊ शकतो, असे ते म्हणाले. अध्यक्षस्थानी गडाचे न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री होते. या वेळी छत्रपती संभाजी महाराज, राष्‍ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, भारिप-बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर, गडाचे विश्वस्त गोविंद घोळवे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते. कार्यक्रमात मात्र सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ येणार म्हणून मोठी गर्दी जमली होती. मात्र, भुजबळ आले नाहीत. भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी आभार मानले.
भुजबळ मनाने आमच्याबरोबर : सध्या देशात निवडणुकीचे वारे वाहत आहे. भुजबळांची अडचण समजण्यासारखी आहे. त्यांना कदाचित बारामतीहून फोन आला असेल. भुजबळ आले नसले तरी मनाने ते आमच्याबरोबर आहेत. त्यांचे गडावर व माझ्यावर प्रेम आहे. त्यांना येथे आणूनच विकासकामांची नियोजित उद्घाटने केली जातील, असे मुंडे यांनी सांगितले.
अचानक डोंगराला आग
मेळाव्यादरम्यान अचानक डोंगराला आग लागली. ती 50 फुटांवर आल्याचे लक्षात येताच पायलटने तत्काळ मुंडे यांचे हेलिकॉप्टर शेजारच्या हेलिपॅडवर उतरवले. मात्र, मुंडे यांनी ही आग राजकीय हेतूने लावल्याचा आरोप केला. ‘आम्ही आग विझविणारे आहोत, आग लावणारे नाहीत. आगीत स्वत: जळू, पण इतरांना झळ पोहोचू देणार नाही,’ असा इशाराही त्यांनी दिला.