आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Off screen Hiroja' Rangali The Occasion Of The Film Talk

‘ऑफस्क्रीन हिरोज’च्या निमित्ताने रंगली फिल्मी चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-पिकल एंटरटेन्मेंट व डॉ. शांताराम कारंडे फाउंडेशनच्या सहयोगाने नगर येथील आशिष निनगुरकर यांच्या ‘ऑफस्क्रीन हिरोज’ या नव्या पुस्तकाच्या घोषणेनिमित्त मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिराच्या मिनी थिएटरमध्ये ‘फिल्म इंडस्ट्री - एक करिअर’ या विषयावर मुक्त चर्चा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमास ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या मुक्त चर्चेत लेखक-दिग्दर्शक अभिजित पानसे, संगीतकार अमितराज, संकलक राहुल भातणकर, कार्यकारी निर्माते हेमेंद्र कुलकर्णी, नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव, समीक्षक सौमित्र पोटे, वितरक समीर दीक्षित सहभागी झाले. फिल्म इंडस्ट्रीमधील आपले अनुभव त्यांनी कथन केले. प्रत्येक क्षेत्रात काय स्ट्रगल असते, फिल्मी दुनियेत काम करताना कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे, करिअर म्हणून काय तयारी असायला हवी अशा अनेक प्रश्नांची उकल यावेळी झाली. मनोरंजन क्षेत्र सर्वांना हवेहवेसे वाटत असले, तरी त्यामागची पार्श्वभूमी समजून घेणे गरजेचे आहे. या क्षेत्रात येण्यापूर्वी अभ्यास करायला हवा. हे क्षेत्र अशाश्वत आहे, परंतु येथे प्रामाणिकपणे व सातत्याने काम केल्यास आणि संयम ठेवला, तर नक्की यश मिळते, असा समारोप या चर्चेतून झाला. सूत्रसंचालन अजय परचुरे यांनी केले.

निनगुरकर यांच्या ‘ऑफस्क्रीन हिरोज’ पुस्तकाच्या लोगोचे प्रकाशन खोटे व डॉ. कारंडे यांच्या हस्ते झाले. हे पुस्तक लवकरच रसिकांच्या भेटीस येणार आहे. या पुस्तकात पडद्यामागील विविध क्षेत्रांतील कलावंतांचा प्रवास मांडण्यात येणार आहे, असे निनगुरकर यांनी सांगितले. खोटे, कारंडे यांनी आजच्या फिल्मी दुनियेतील विविध गोष्टी सांगितल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण बेर्डे यांनी केले, तर आभार रमेश ननावरे यांनी मानले.

नगर येथील आशिष निनगुरकर यांच्या ‘ऑफस्क्रीन हिरोज’ या पुस्तकाच्या लोगोचे अनावरण करताना अभिनेते विजू खोटे. समवेत अजय परचुरे, सौमित्र पोटे, राहुल भातणकर, डॉ. शांताराम कारंडे, समीर दीक्षित, उमेश जाधव, अभिजित पानसे, अमितराज व हेमेंद्र कुलकर्णी.