आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भ्रष्टाचारप्रकरणी मुख्य अभियंता निलंबित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे - शहरातील जलवाहिनीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यानंतर नगरपालिकेचे मुख्य अभियंता धनलाल सुरंजे यांना जिल्हाधिकार्‍यांनी निलंबित केले. या प्रकरणात दोषी असणार्‍या अन्य बड्या आसामींबाबत मात्र प्रशासन नरमाई दाखवत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतरही नगरपालिकेने अद्यापि कोणाविरुद्धही गुन्हा दाखल केलेला नाही.

शहरातील जकातेवस्ती येथील नळयोजनेतील जलवाहिनीच्या कामात मंजूर निविदेप्रमाणे लोखंडी पाइप वापरण्याऐवजी साधे पाइप वापरण्यात आले होते. या कामाचे बिल मात्र लोखंडी पाइपप्रमाणे काढण्यात आले. याप्रकरणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे कारवाईची मागणी केली होती. नगरपालिकेचे प्रकल्पाधिकारी चंद्रकांत खोसे यांच्या समितीने चौकशी करून जिल्हाधिकार्‍यांना अहवाल सादर केला. त्यात अभियंता धनलाल सुरंजे, संबंधित ठेकेदार एस. बी. बोरुडे यांच्यासह इतरांवर ठपका ठेवला होता. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी पालिका मुख्याधिकार्‍यांना दिले होते. दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत सोनवणे यांनी गुन्हा कसा दाखल करावा, याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडून सल्ला मागितला. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी अभियंता सुरंजे यांना तडकाफडकी निलंबित केले. गुन्हा दाखल करण्यात झालेल्या दिरंगाईबद्दल मुख्याधिकार्‍यांना खुलासा करण्याचे सांगितले आहे. भ्रष्टाचार झाला तेव्हा असलेले प्रभारी मुख्याधिकारी पोपट कोल्हे व नगराध्यक्ष सुनीता खेतमाळीस यांच्यावरदेखील हे प्रकरण शेकण्याची चिन्हे आहेत.