आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांच्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - केडगाव लिंक रस्त्यावरील कवडेमळा येथे चोरट्यांच्या मारहाणीत सदाशिव माधवराव कवडे (65) या वृद्धाचा मृत्यू झाला. चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा 70 हजारांचा ऐवजही लांबवला. ही घटना रविवारी रात्री घडली.
कवडेमळ्यात चार-पाच कुटुंबे राहतात. सदाशिव कवडे हे आपल्या तीन मुलांसह या वस्तीवर राहत होते. रविवारी रात्री स्वयंपाकघरात ते झोपले होते. त्यांची मुले अशोक, विजय व विनोद हे बाहेरच्या खोलीत झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील तीन पत्र्यांच्या पेट्या उचकटून त्यातील 40 हजार रुपये रोख व 30 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या त्यांनी घेतल्या. त्याचवेळी सदाशिव कवडे यांना जाग आली. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी त्यांना मारहाण केली. नंतर चोरटे पसार झाले. जखमी झालेल्या कवडे यांचा मृत्यू झाला.
सकाळी जाग आल्यावर अशोक कवडे स्वयंपाकघरात गेले असता वडील मृतावस्थेत आढळले. त्यांनी आपल्या भावांना याबाबत सांगितले. या घटनेची माहिती कळताच परिसरातील लोकही तेथे गोळा झाले. घरातील ऐवज चोरीला गेल्याचेही नंतर लक्षात आले. या घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक श्याम घुगे, कोतवाली ठाण्याचे निरीक्षक ए. टी. पवार पथकासह घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकास पाचारण करण्यात आले.
श्वानाने काटवनापर्यंत माग काढला. तेथे पत्र्याच्या तीन रिकाम्या पेट्या व कपडे सापडले. चोरटे तेथून वाहनाने पसार झाले असावेत, असा पोलिसांचा कयास आहे. अशोक कवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी खून व जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक ए. टी. पवार करीत आहेत.
गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये लिंकरस्त्यावर एका दाम्पत्यासह घरगड्याची निर्घृण हत्या झाली होती. त्यांच्या दुस-या घरगड्यानेच ही हत्या केल्याचे नंतर स्पष्ट झाले.