आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारनेर तालुक्यात ओमनी व्हॅनसह तिघे वाहून गेले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. वडझिरे येथील ओढ्याला आलेल्या पुरात ओमनी व्हॅनसह तीनजण पाण्यात वाहून गेले. ही दुर्घटना गुरुवारी सायंकाळी चार वाजता घडली. अवधूत सुखदेव परंडवाल (24, अळकुटी), सुदर्शन बाजीराव आवारी (22, रांधे) व बाळू मुरगन (29, तामिळनाडू) अशी त्यांची नावे आहेत. पावसामुळे गोरेगाव, सुपा, कान्हूर पठार या भागांत विजेचे खांब व वृक्ष कोसळले. काही भागांत घरे, दुकाने पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.


गुरुवारी दुपारी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वडझिरे येथे तुफान पाऊस झाला. पाडळी दर्या, जाधववाडी येथेही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या भागातील पाणी वडझिरे येथील ओढ्यात आले. पारनेर-अळकुटी रस्त्यावरील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. अळकुटीकडे जाणारी ओमनी व्हॅन (एमएच 12, 3210) पुलावर बंद पडली. गाडी लोटण्याच्या प्रयत्नांत पाण्याचा जोर वाढल्याने गाडीसह चालक अवधूत परंडवाल, सुदर्शन आवारी, बाळू मुरगन हे तिघेजण वाहून गेले. मृगेश मुरगन याला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले.या घटनेमुळे पारनेर-अळकुटी मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती. शिवडोह तलावात तिघांचा शोध सुरू होता. परंतु रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागू शकला नाही.


महिला बचावल्या
वडझिरे येथे झालेल्या दुर्घटनेतील गाडीमध्ये महिला प्रवाशांचाही समावेश होता. परंतु पुलावरील पाणी पाहिल्यानंतर या महिलांनी अलीकडेच उतरून घेतल्याने त्यांचा जीव वाचला.