आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - शिवचरित्र लिहून 52 वर्षे झाली. दरम्यानच्या काळात अनेक नव्या गोष्टी सापडल्या. आता माझे वय 91 आहे. आणखी 5 वर्षे खणखणीत आयुष्य मिळाले, तर शिवचरित्राची नवी आवृत्ती काढेन, असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी रविवारी येथे बोलताना सांगितले.
भारतीय संस्कृती सेवा प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा पाचवा पं. मदनगोपाल व्यास पुरस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमाकांत व्यास यांच्या हस्ते पुरंदरे यांना प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते श्यामसुंदर जाजू, आमदार अनिल राठोड, उपमहापौर गीतांजली काळे, योगेश्वर व्यास आदी उपस्थित होते.
पुरंदरे म्हणाले, आयुष्य किती आहे हे मला माहीत नाही. आणखी पाच वर्षे आयुष्य मिळायला हवे, कारण मला शिवचरित्राची नवी आवृत्ती काढायची आहे. शिवाजी महाराज कैदेतून शिताफीने सुटले. ते सुटल्याचे परमेश्वरालादेखील आश्चर्य वाटले. ते आग्रा येथे कैदेत असताना जिजाऊ राज्यकारभार करत होत्या. त्यांना मुलाची चिंता होती. मुलगा परत केव्हा येईल, हे माहिती नसतानाही त्यांनी रांगणासारखा किल्ला ताब्यात घेतला, कारण त्या कर्तबगार होत्या. शिवाजी महाराज आग्रा येथून परतत असतानाच त्यांच्या मनात गोवा ताब्यात घेण्याचा विचार सुरू होता, असे पुरंदरे यांनी सांगितले.
चर्चिलने दुसरे महायुद्ध जिंकले, पण त्यांचा पुतळा मला तिथे दिसला नाही. मी एकाला विचारले, ‘‘तुम्ही चर्चिलला विसरलात का?’’ त्यावर तो म्हणाला, चर्चिल आमच्या रक्तात आहे. त्यामुळे पुतळ्याची गरज नाही. शिवाजी महाराज व जिजाऊ आपल्या रक्तात आहेत का? की आपण केवळ त्यांना मनगटावर अत्तरासारखे ठेवले आहे? छत्रसालाने शिवरायांची भेट घेऊन सैन्यात घेण्याची विनंती केली होती. त्यावर ते म्हणाले, जे मी महाराष्ट्रात केले, ते तू बुंदेलमध्ये कर. मनात आणले तर वाटेल ते करता येईल हा संदेश शिवरायांनी दिला. थोड्याच दिवसांत छत्रसालाने बुंदेलखंड स्वतंत्र केला, असे पुरंदरे यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.