आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामखेडमध्ये वर्षभरात टँकरवर दीड कोटी खर्च

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड - जामखेड तालुक्यातील गेल्या वर्षभरात टँकर आणि विहीर अधिग्रहणावर तब्बल दीड कोटी रुपये खर्च झाला आहे. सध्या तालुक्यात 63 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून पुढील दोन महिन्यांत टँकरच्या संख्येत वाढ होणार आहे.

एकट्या जामखेड शहरासाठी टँकरची संख्या 20 वर पोहोचली आहे. पूर्वी शहरातील सदाफुले वस्ती व आरोळेनगर भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. दोन दिवसांपासून 22 हजार लिटर क्षमतेचे 10 टँकर जामखेड शहरासाठी नव्याने सुरू करण्यात आले आहे. या टँकरला तीन खेपा मंजूर आहेत. परंतु टँकरच्या सरासरी दोनच खेपा होत आहेत. जामखेडसाठीचे सर्व टँकर चौंडीहून भरले जात आहेत. टँकरचे पाणी शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पाण्यात टाकीत सोडून त्याद्वारे पाणी नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे शहराला पुरवले जात आहे. तालुक्यात 48 गावे आणि 32 वाड्यावस्त्यांना 63 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 63 टँकरपैकी 36 टँकर हे चौंडी येथील पाणीपुरवठा विहिरीवरून भरले जात आहेत. जामखेडसह अरणगाव, पाडळी, पिंपरखेड, हाळगाव यासह तब्बल 25 गावांना चौंडी येथूनच पाणीपुरवठा केला जात आहे.


एक टँकर भरण्यासाठी लागतात दोन तास

चौंडी येथे टँकर भरण्यासाठी दोन तासांचा वेळ लागत आहे. या ठिकाणी 7-8 टँकर कायम पाणी भरण्यासाठी उभे असतात. एकच पंप त्यातच टँकरची संख्या जात असल्याने पाणी भरण्यास वेळ जाऊन पर्यायाने टँकरच्या अपेक्षित खेपा होत नाही. यासाठी चौंडी येथे वीजपंपांची संख्या वाढवून एकावेळी अनेक टँकर भरण्याची व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.


टँकरच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन

तालुक्यातील जवळा गावास टँकर चालू करण्याची मागणी करूनही प्रशासनाकडून टँकर चालू करण्यास चालढकल केली जात आहे. याप्रश्‍नी जवळा ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.