आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेचे एक कोटी गेले ‘खड्डय़ां’त !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- खड्डा..डागडुजी..पुन्हा खड्डा, असे चक्र गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे, तरी शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील जीवघेण्या खड्डयांची संख्या कमी झाली नाही. उलट, दर तीन महिन्यांनी रस्ते डागडुजीच्या नावावर (पॅचिंग) लाखो रुपयांची उधळपट्टी महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. मागील पाच वर्षांत पॅचिंगच्या कामावर तब्बल एक कोटीपेक्षा अधिक खर्च झाला, तरी रस्त्यांची स्थिती जैसे थे आहे. विशेष म्हणजे हा खर्च जनतेकडून वसूल केलेल्या विविध करांच्या रकमेतून करण्यात आला आहे. मात्र, तो ‘खड्डयां’त गेल्याने नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत आहे.

शहरातील वाहतूक व्यवस्थेचा आधीच बोजवारा उडाला आहे, त्यातच रस्त्यांवरील खड्डयांनी नगरकरांना त्रासले आहे. मुंबई महानगरपालिका प्रांतिक अधिनियम 1949 च्या कलम 484 नुसार नगरसेवक, पदाधिकारी व अधिकार्‍यांनी जनतेचे सेवक म्हणून काम करणे अपेक्षित आहे. दज्रेदार रस्त्यांच्या सुविधेबरोबरच तसेच शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. मात्र, सध्या शहरात उलट परिस्थिती दिसून येत आहे. शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. शासनाच्या नगरोत्थान योजनेंतर्गत 30 ते 35 रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी बालिकार्शमसह काही रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित रस्त्यांच्या कामांना अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. नगरोत्थान योजनेत समाविष्ट नसलेले दिल्लीगेट ते पत्रकार चौक, नेप्तीनाका चौक ते आयुर्वेद कॉलेज, लालटाकी ते सर्जेपुरा चौक, प्रोफेसर कॉलनी चौक ते भिस्तबाग नाका आदी रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. याशिवाय मध्यवर्ती शहर तसेच उपनगरातील अंतर्गत रस्त्यांची परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही. पावसाळा सुरू झाला असून आतापर्यंत झालेल्या थोड्याफार पावसातच अनेक रस्त्यांवर गुडघाभर खोल खड्डे तयार झाले आहेत. काही ठिकाणी तर वाहनचालकांवर अक्षरश: रस्ता शोधण्याची वेळ आली आहे. अनेकांना अपघातालाही सामोरे जावे लागत आहे. काही नागरिक, तर या जीवघेण्या खड्डयांमुळे घराबाहेरही पडत नाहीत. सर्वांत वाईट अवस्था दिल्लीगेट ते पत्रकार चौक रस्त्याची झाली आहे. लालटाकी परिसरात तर ‘रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

महापालिका प्रशासनाने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी (पॅचिंग) मागील पाच वर्षांत तब्बल एक कोटीपेक्षा अधिक खर्च केला आहे. मात्र, हा खर्च केवळ कागदोपत्रीच आहे. एकदा खड्डा बुजवला की, महिनाभरात त्याच ठिकाणी पुन्हा खड्डा तयार होतो. खड्डा भरताना त्यात खडी न टाकता माती, विटांचे तुकडे, तसेच केरकचरा टाकण्यात येतो. त्यामुळे पॅचिंगच्या ठिकाणी पुन्हा खड्डा तयार होतो. गेल्या पाच वर्षांपासून हे चक्र असेच सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या खर्चाची आकडेवारी पाहिली, तर जनतेच्या पैशांची उधळपट्टी कशी होते ते स्पष्ट होते. ‘दिव्य मराठी’टीमने शनिवारी वेगवेगळ्या रस्त्यांवरील खड्डयांची पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली. रस्त्यांवर झालेला खर्च गेला कोठे, खर्च करताना कामांचा दर्जा तपासला का, रस्ते का उखडले, जनतेचे सेवक म्हणून घेणारे नगरसेवक करतात तरी काय, यांसारखे अनेक प्रश्न यावेळी नागरिकांनी उपस्थित केले.