आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Get Life Imprisonment, Three One Year Jail In The Case Of Murder

खूनप्रकरणी एकास जन्मठेप, तिघांना एक वर्षाचा कारावास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - जमिनीच्या वादातून तलवारीने हल्ला करून तालुक्यातील लोहारे मीरपूर येथील संतू जयराम रणमाळे (६७) यांचा खून केल्याप्रकरणी एका आरोपीला जन्मठेपेची, तर अन्य लोकांच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरलेल्या तिघांना एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा संगमनेरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारी ठोठावली.

अनिल नाना येलमामे असे खूनप्रकरणी जन्मठेप झालेल्याचे, तर नंदू नाना येलमामे, रमेश नाना येलमामे राजू नाना येलमामे अशी एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. मीरपूर लोहारे येथील संतू जयराम रणमाळे यांचे आरोपी अनिल येलमामे याच्याशी शेतीच्या कारणावरून वाद होते. वादाचे पर्यावर्सन ऑक्टोबर २००३ रोजी हाणामारीत झाले. संतू जयराम रणमाळे यांचे नांदूर शिंगोटे ते लोणी या रस्त्यावर लोहारे मिरपूर येथे चहाचे हॉटेल आहे. आदल्या दिवशी आरोपी आणि त्यांच्यात वाद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पत्नीसह हॉटेल उघडल्यानंतर आरोपी अनिल येलमामे याने तेथे कारमधून येत संतू रणमाळे यांना मारहाण केली. तलवारीचे वार करून त्यांचा खून केला. त्यांच्या पत्नीसह अन्य तिघांनी ही घटना पाहिली होती. त्यानंतर तेथे आलेल्या अन्य लोकांनी मृताच्या नातेवाईकांना मारहाण केली.
यात चार-पाच जण जखमी झाले. मृताचा मुलगा दत्तू संतू रणमाळे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात अठरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल साडेअकरा वर्ष हा खटला सुरू होता. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. फरार आरोपींना त्यांनी अटक केली. घटनेनंतर तपासाअंती निष्पन्न झालेल्या आरोपीविरुद्ध त्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा सत्र न्यायाधीश शि. मा. भगत यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. न्यायाधीश भगत यांच्यासमोर आलेल्या पुराव्याच्या आधारावर आरोपी अनिल येलमामे याला खूनप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय पाच हजार रुपये दंड आणि दंड भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. उर्वरित नंदू नाना येलमामे, रमेश नाना येलमामे राजू नाना येलमामे या तिघा आरोपींना एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा, प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड आणि दंड भरल्यास महिना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. खटल्यातील एकूण अठरा आरोपींपैकी तिघांचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. अन्य आरोपींची न्यायाधीश भगत यांनी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. सरकारच्यावतीने अॅड. केशवराव गोडगे यांनी काम बघत खटल्यातील बारकावे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.