आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Lakh Application For Electricity Voluntieer In District

जिल्ह्यात विद्युत सेवकांच्या 7 हजार जागांसाठी 1 लाख अर्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महावितरणमधील 7 हजार विद्युत सेवकांच्या भरतीत मराठवाड्याला डावलले गेले आहे. सर्वाधिक अकराशे जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मतदारसंघ असलेल्या बारामती परिमंडळासाठी देण्यात आल्या आहेत. औरंगाबादला केवळ 160 जागा देण्यात येणार आहेत. नगर जिल्ह्यात 250 जागांची भरती होणार आहे. दरम्यान, राज्यभरातील 7 हजार जागांसाठी 1 लाख उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

महावितरणमध्ये कंत्राटी पध्दतीने हजारो कामगार काम करतात. या कामगारांचे कंत्राटदारांकडून आर्थिक शोषण केले जात होते. त्यामुळे महावितरणने विद्युत सेवकांच्या 7 हजार जागा भरण्याचा निर्णय घेतला होता. या जागा आयटीआय व इयत्ता दहावी बेसवर भरण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी महावितरणने भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिध्द केली होती. मात्र, त्यानंतर ही भरती प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रियेत अडकली. आता भरतीचा मार्ग मोकळा झाला असून राज्यातील 13 परिमंडलांत ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. कल्याण, भांडुप, पुणे, नाशिक, कोकण, कोल्हापूर, लातूर, नांदेड, जळगाव, औरंगाबाद, अमरावती, नागपूर शहर व ग्रामीण परिमंडळात सात हजार विद्युत सेवकांची पदे भरण्यात येणार आहेत.विद्युत सेवकांची पदे भरल्यानंतर ग्राहकांच्या तक्रारी निकाली काढण्यास मोठी मदत होणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.


भरती प्रक्रिया पारदर्शी, आमिषाला बळी पडू नका..
विद्युत सेवक पदांची यादी गुरुवारी (11 एप्रिल) जाहीर करावी, अशी मागणी राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेने महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांच्याकडे केली होती. मेहता यांनी उमेदवार यादी पुढील गुरुवारी (18 एप्रिल) जाहीर करण्याचे आश्वासन संघटनेच्या पदाधिकार्‍यांना दिले आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शी होणार असून उमेदवारांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये.’’ भाऊसाहेब भाकरे, सदस्य, कोअर कमिटी, तांत्रिक कामगार संघटना.


भरती करण्यात येणार्‍या जागा
बारामती - 1 हजार 156, औरंगाबाद - 160, लातूर - 259, कल्याण - 786, भांडुप - 291, नाशिक - 776, कोकण - 374, कोल्हापूर - 998, नांदेड - 304, जळगाव - 532, अमरावती - 890, नागपूर शहर - 58, नागपूर ग्रामीण - 67.