आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच गळतीतून दिवसाला दीड लाख लिटर पाणी वाया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - टंचाईच्या काळातही महापालिका प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला जागोजागी भगदाड पडले आहे. त्यातून दररोज कोट्यवधी लिटर पाणी वाया जात आहे. मनमाड रस्त्यावरील शिंगवे तुकाई गावाजवळील एकाच गळतीच्या ठिकाणाहून दिवसभरात तब्बल दीड लाख लिटर पाणी वाया जात आहे. चार महिन्यांपासून ही गळती सुरू असून आतापर्यंत या एकाच गळतीतून एक कोटी ८० लाख लिटर पाणी वाया गेले आहे. कायम बेफिकीर असलेले महापालिका प्रशासन टंचाईच्या काळातही या पाणी गळतीकडे ढुंकून पाहायला तयार नाही, ही शोकांतीका आहे.

नगर शहराला ३२ किलोमीटर अंतरावरील मुळा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी चार दशकांपूर्वी मुळानगर ते शहरापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे. या जलवाहिनीला सध्या जागोजागी गळती लागली आहे. वर्षानुवर्षे ही गळती सुरू असून त्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. शहरासाठी दररोज सुमारे ५८ दशलक्ष लिटर पाणी उपसा केला जाताे, परंतु त्यातील कोट्यवधी लिटर पाणी वाया जात आहे. मुळा धरणात जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. वेळत पाऊस पडला नाही, तर शहरासमोर पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे राहणार आहे. अशा परिस्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर होणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. परंतु उपाययोजना, तर दूरच जलवाहिनीवरील गळतीची पाहणी करण्यासाठी देखील प्रशासनाला वेळ नाही. राज्यासह जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे, टँकरच्या संख्येने अातापर्यंतचा विक्रम मोडीत काढला आहे. सर्वत्र पाणी बचतीसाठी प्रयत्न होत आहेत. महापालिका प्रशासनाने मात्र झोपेचे सोंग घेतल्याचे चित्र आहे. नगर-मनमाड रस्त्यावरील शिंगवे तुकाई गावाजवळ मुख्य जलवाहिनीला गेल्या चार महिन्यांपासून मोठी गळती लागली आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी मागणी करूनही मनपाचे अधिकारी या गळतीच्या ठिकाणी फिरकलेले नाहीत. या ठिकाणी दिवसभरात सुमारे दीड लाख लिटर पाण्याची नासाडी सुरू आहे. जलवाहिनीवर अशी अनेक ठिकाणी गळती असून त्यातून दररोज कोट्यवधी लिटर पाणी वाया जात आहे.

मिनिटाला बादल्या
शिंगवेतुकाईजवळ जलवाहिनीला लागलेली गळती एवढी मोठी आहे, की तेथे एका मिनिटात २०-२० लिटरच्या पाच बादल्या भरतात. ही गळती गेल्या चार महिन्यांपासून २४ तास सुरू आहे. सर्वत्र तीव्र पाणीटंचाई आहे, त्यामुळे ही पाणीगळती बंद करावी, अशी परिसरातील शेतकऱ्यांची इच्छा आहे.

उपयुक्त साठा ९.५ %
शहरालापाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणाने यंदा तळ गाठला आहे. धरणात सध्या हजार ५३७ दशलक्ष घनफूट (६.५ टीएमसी) पाणी आहे. यातील हजार ५०० मृतसाठा वगळता अवघा हजार ३७ दलघफू उपयुक्त पाणी शिल्लक आहे. गेल्या अनेक वर्षांतील उपयुक्त पाण्याचा हा नीचांक आहे.

उशिराचे शहाणपण
'दिव्य मराठी'ने 'चला करूया पाणी बचत' हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाशी शहरातील अनेक जागरूक नागरिक सामाजिक संघटना जोडल्या गेल्या आहेत. पाणी गळती उधळपट्टीकडे मनपा प्रशासनाचे कसे दुर्लक्ष आहे, ते 'दिव्य मराठी'ने वाचकांसमोर ठेवले. त्यामुळे मनपाने बुधवारी प्रसिध्दीपत्रकाद्वारे नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन केले. पाण्याचा काटकसरीने वापर करावा, नळांना मीटर बसवावेत, नळांना एका महिन्याच्या आत तोट्या बसवाव्यात, हॉटेल व्यावसायिकांनी ग्राहकांना अर्धा ग्लास पाणी देण्याची पद्धत सुरू करावी, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे. परंतु हे आवाहन यापूर्वीच केले असते, तर आतापर्यंत लाखो लिटर पाणी निश्चितच वाचले असते.

आम्हीही संवेदनशील
महापालिकेसह एमआयडीसीकडे वेळोवेळी पाठपुरावा करून पाणी गळती निदर्शनास आणून दिली. परंतु चार महिने झाले, तरी मनपाचा एकही कर्मचारी फिरकला नाही. ही जलवाहिनी आमची नाहीच, अशी उडवाउडवीची उत्तरे दोन्ही कार्यालयातील अधिकारी देत आहेत. अनेकांना वाटते की आम्हीच मनपाची पाइपलाइन फोडून पाणी घेतले. पण दुष्काळाच्या झळा आम्हालाही कळतात, आम्ही अशी पाण्याची उधळपट्टी करणार नाही. उलट, या गळतीमुळे माझी शेती नापीक झाली आहे. जलवाहिनी फुटून वाहणारे पाणी थेट शेतात सुरू आहे. परंतु एवढ्या पाण्याचे आम्ही काय करणार, मनपा प्रशासनाने तातडीने ही गळती बंद करणे आवश्यक आहे. विवेक शिंदे, शेतकरी.