आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महागाईची झळ; मिसळ अन् भेळीतून कांदा झाला गायब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढल्यामुळे आता अनेकांनी कांद्याची ढाल करून ग्राहकांवर महागाई लादण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश हॉटेल्स व ढाब्यांवर कांदा गायब झाला. मिसळ व भेळीमध्ये लज्जत वाढवणारा कांदा आता गायब होऊ लागला असून या कांद्याची जागा आता टोमॅटो, काकडी, मुळा व गाजराने घेतली आहे, तर राईसप्लेटचे भाव वाढल्यामुळे काही दिवसांसाठी महागलेल्या कांद्याआडून ग्राहकांवर महागाई लादण्याचे चक्र फिरू लागले आहेत.

कांद्याची एक फोड जेवणाचे समाधान वाढवते. आरोग्य, आहार व आवड असे कांद्याचे विविध गुण आहेत. चार सदस्यांच्या कुटुंबासाठी एकवेळच्या स्वयंपाकाकरिता एक कांदा पुरतो. जेवणाच्या ताटात कांद्याची एक फोड पुरते. आवड असलीच, तर एक बारीक कांदा जेवणाचे समाधान व लज्जत वाढवण्यास पुरेसा असतो. मात्र, बदलत्या हवामानामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कांदा तब्बल 50 ते 60 रुपये प्रतिकिलोंवर पोहोचला आहे. कांदा व भाजीपाल्याचे दर वाढल्यामुळे हॉटेल्सचालकांनीही दरवाढ करण्यास सुरुवात केली आहे.

उडपी हॉटेल्समध्ये मिळणार्‍या राईसप्लेटमध्ये कांदा नसतो. पण ग्राहकाला कांदा हवा असल्यास मागणी करावी लागते. मध्यवर्ती बसस्थानक भागातील हॉटेल्समध्ये राईसप्लेट आता 60 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. मांसाहारी, पंजाबी हॉटेल्समध्ये टेबलावर कांदा, मीठ अन् लिंबू व आंब्याचे लोणचे असते. मात्र, या टेबलावरूनही आता कांदा गायब आहे. त्याची जागा मुळाच्या चकत्या व गाजराने घेतली. सध्या कांद्यासह कांदा पातही महागलेली आहे. भाजीपाल्याच्या दरवाढीने अनेक महिलांनी सायंकाळी तूर किंवा मुगाची डाळ व भाताची खिचडी असा स्वयंपाक सुरू केला आहे.

सध्याच्या दरवाढीमुळे गृहिणीचे बजेट कोलमडले असून महिलावर्ग त्रस्त झाला आहे. भाजीपाल्यांचे दर आवाक्यात कधी येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. बाजारात तूर, उडीद, मूग, मसूर, मठ या डाळींचे दरही वाढले आहेत. यंदा मध्यप्रदेश व अन्य राज्यांत डाळींच्या पिकाला हवामानाची झळ बसल्यामुळे डाळींच्या दरातही वाढ झालेली आहे. तेसुद्धा महागाईचे एक कारण आहे. जेवणामध्ये काय भाज्या करायच्या अशी चर्चा आता घरांमध्ये होऊ लागली आहे. सर्व प्रकारच्या कडधान्यांच्या भाज्यांना कांदा लागतो. त्यामुळे कांदा न लागणार्‍या भाज्यांचे प्रमाण जेवणात वाढत आहे.