आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांदा पन्नाशीत गेल्याने जिल्ह्यातील शेतकरी खूश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कांद्याच्यादराने गेल्या पाच वर्षांतील उच्चांक गाठला आहे. नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात सोमवारी झालेल्या लिलावात कांद्याला प्रतिक्विंटल ५६५० रुपयांचा उच्चांकी कमाल दर मिळाला. दुष्काळी परिस्थिती पाहता काद्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

श्रावण महिन्यात कांद्याच्या मागणीत घट होऊन दर उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरवत कांद्याच्या दराने सोमवारी उच्चांक गाठत दराची पन्नाशी ओलांडली. नेप्ती उपबाजारात सोमवारी झालेल्या लिलावात एक नंबरचा कांदा ४६५० ते ५६५० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला. दोन नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल ३२०० ते ४६२५ रुपये दर मिळाला, तर तीन नंबरचा कांदा प्रतिक्विंटल १३०० ते ३१५० रुपये दराने विकला गेला. गोल्टी कांद्यानेही चांगलाच भाव घेतला. गोल्टी कांदा प्रतिक्विंटल ३५०० ते ४८०० रुपये दराने व्यापाऱ्यांनी विकत घेतला. नेप्ती उपबाजाराप्रमाणेच जिल्ह्यातील घोडेगाव, राहुरी, कोपरगाव, पारनेर बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दराने उच्चांक प्रस्थापित केला आहे.

जिल्ह्यात नगदी पीक म्हणून कांद्याच्या लागवडीला शेतकऱ्यांकडून अधिक पसंती मिळत आहे. त्यामुळे कांद्याच्या पिकाखालील जिल्ह्यातील क्षेत्र वाढत आहे. जिह्यात सरासरी १६ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप कांदा पीक घेण्यात येत असल्याची कृषी विभागाची आकडेवारी आहे. कमी कालावधीत रोकड हाती देणारे पीक म्हणून कांद्याला प्राधान्य मिळत असून सरकारी आकडेवारीपेक्षा अधिक क्षेत्रावर कांद्याची लागवड होत आहे.

विशेषत: दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी कांदा वरदान ठरत आहे. मात्र, यंदा अकोले वगळता इतर तेरा तालुक्यांमध्ये जेमतेम पाऊस झाल्याने कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात घसरले आहे.

धरणातील सिंचनावर अवलंबून असलेल्या क्षेत्रावरील खरीप कांदा आवर्तनाअभावी धोक्यात आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याच्या दरात तिप्पट वाढ नोंदवण्यात आली आहे. मे महिन्याच्या अखेरीस एक नंबर कांदा १८०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला होता. जूनच्या मध्यापर्यंत यात किरकोळ वाढ झाली. मात्र, पाऊस लांबत गेल्याने दरातील वाढ कायम राहिली.

खरिपातील अत्यल्प लागवड येणाऱ्या नवीन कांद्याचे कमी प्रमाण लक्षात घेता कांद्याच्या दरामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. वाढीव दराने सर्वसामान्य ग्राहकांच्या डोळ्यांमधून कांद्याने पाणी काढले आहे.

वाढीव दराचा लाभ घ्यावा
^नेप्ती उपबाजारात सोमवार, गुरुवार शनिवार असे आठवड्यातून तीन दिवस कांद्याचे लिलाव होतात. सोमवारी जवळपास १२ हजार कांदा गोण्यांची आवक झाली. उच्चांकी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वाढीव दराचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणावा.'' हरिभाऊकर्डिले, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नगर.

साठवणुकीचा फायदा
^उन्हाळ्यात कमी दर मिळत असल्याने कांदा साठवून ठेवला होता. यासाठी कांदा चाळीचा अधिक उपयोग झाला. आता लिलावात दर चांगला मिळत असल्याने कांदा विक्रीसाठी बाजारात आणत आहोत. दोन-तीन वर्षातून चांगला दर एखादे वेळेसच मिळतो. चढ्या दरामुळे दुष्काळात चांगलाच दिलासा मिळत आहे.'' अशोकरोकडे, कांदा उत्पादक, खडकी.

लागवड क्षेत्र घटले
^जिल्ह्यात कांद्याच्या लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. सध्या सरासरी १६ हजार हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड होत आहे. यंदा पावसात पडलेला मोठा खंड त्यानंतरही समाधानकारक पाऊस नसल्याने कांदा लागवड क्षेत्रातही घट झाली. परिणामी उत्पादनातही घट होणार आहे.'' अंकुशमाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

दोन महिने चढे दर
^जिल्ह्यातपावसाने दडी मारल्याने खरीप कांद्याची लागवड अत्यल्प प्रमाणात झाली आहे तर झालेली लागवडही धोक्यात आहे. त्यामुळे नवीन कांद्याची आवकही अत्यल्प आहे. आणखी दोन महिने चांगल्या कांद्याचे दर प्रतिकिलो पन्नास रुपयेच राहण्याची शक्यता आहे.'' नंदकुमार शिकरे, कांदा व्यापारी.