आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफी रुतली ‘डिजिटल’च्या चिखलात, आतापर्यंत भरले अवघे 14 हजार शेतकऱ्यांनी अर्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा करून दीड महिना होत आला, तरी अनुदान शेतकऱ्यांच्या पदरात पडलेले नाही. शेतकऱ्यांना आठ दिवसांपूर्वीच ऑनलाइन ऑफलाइन अर्ज सेतू केंद्रात भरण्याचे फर्मान काढण्यात आले. तथापि, आधारकार्डात राहून गेलेल्या त्रुटी, तसेच सर्व्हर डाऊनमुळे अर्ज भरण्यापासून अनेक शेतकरी वंचित रहात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ९६ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांपैकी केवळ १४ हजार ४०३ शेतकऱ्यांचे अर्ज भरले गेले आहेत. अनेक तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी ‘डिजिटल’च्या चिखलात रुतली आहे. 
 
राज्य मंत्रिमंडळाच्या २४ जून रोजी झालेल्या विशेष बैठकीत कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना जाहीर करून सरसकट दीड लाखाची कर्जमाफी करण्याची घोषणा झाली. या निर्णयातही वारंवार बदल करण्यात आले. सुरुवातीला एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्यांना माफी देण्याचा निर्णय झाला. दरम्यान, जिल्हा लेखा परीक्षकांनी खाते उतारे निकषानुसार तपासून सर्व सभासद शेतकऱ्यांचे परीक्षण सुरू केले. पुन्हा निकषांत बदल करून ३१ जुलै २०१७ पर्यंत थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे लेखापरीक्षण थांबले. आता पुन्हा शेतकऱ्यांना अॉनलाइन ऑफलाइन अर्ज भरण्याचे सांगितले. वारंवार होत असलेल्या बदलामुळे अंमलबजावणी करणारे प्रशासन भांबावून गेले. 
 
ऑनलाइन ऑफलाइन अर्ज भरताना शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यात एक हजार ४१२ सेवा केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी सीएससी, आपले सरकार, महा ई-सेवा केंद्र उपलब्ध करण्यात आले. सुरुवातीला अर्ज भरताना शेतकऱ्यांचे आधारकार्ड लिंक होत नसल्याने अडचणी आल्या. त्यानंतर ऑनलाइन अर्जासाठी एक हजार १२८ बायोमेट्रिक यंत्राचा पुरवठा सेतू केंद्रात करण्यात आला. त्यातच सर्व्हर डाऊन होत असल्याच्या अडचणी येत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे, असे सेतूचालक समन्वयकांनी नाव घेण्याच्या अटीवर सांगितले.

 
जिल्ह्यात सुमारे ३० जून २०१६ पर्यंत एक लाख ९६ हजार थकबाकीदार शेतकरी आहेत. कर्जमाफीसाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचा अजूनही शोध सुरूच आहे. शेतकऱ्याला जटिल नियमावलींमुळे लाभाऐवजी मनस्तापच सहन करावा लागतोय. सरकारच्या डिजिटल यंत्रणा राबवण्याच्या अट्टहासामुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून अजूनही वंचित आहेत. 
 
ऑनलाइनच्या अडचणी 
सर्व्हरडाऊनची मोठी अडचण आहे. मागील दोन दिवसांपासून सर्व्हरमुळे अडचणी आल्या. जेथे आधार लिंक नाहीत, तेथे ‘थम्ब मशीन’चा पुरवठा केला आहे. वेळोवेळी येणाऱ्या अडचणी वरिष्ठ पातळीवर कळवण्यात आल्या अाहेत, अशी माहिती महा ई-सेवा केंद्रातील समन्वयकाने दिली. 
 
अर्ज भरणे अवघड 
सरकारने ऑनलाइनचादुराग्रह सुरू ठेवल्याने कर्जमाफीचे अर्ज भरणे शेतकऱ्यांना अशक्य होऊन बसले आहे. दान नको, पण कुत्रे आवर अशी या कर्जमाफीच्या योजनेची गत सरकारने करून ठेवली आहे. शेतकऱ्यांच्या मनात संताप वाढतो आहे. त्यामुळे सोमवारी (१४ ऑगस्ट) आयोजित चक्काजाम आंदोलनात राज्यभरातील शेतकरी रस्त्यावर येतील. 
- अजित नवले, सुकाणू समिती. 
 
आता गती येणार 
अर्जभरण्याची प्रक्रिया सुरूच अाहे. दाखल अर्जांची छाननी केली जाईल. त्यानंतर पुन्हा ऑडिटरकडून शहानिशा होईल. सेतू केंद्रातील पीकविमा, तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या दाखल्यांचे काम सुरू होते. ही कामे आटोपल्यामुळे आता ऑनलाइन अर्ज दाखल करण्यास गती येईल. जिल्ह्यात एक हजार १२८ पॉस मशीनचा पुरवठा करण्यात आला. 
- अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा उपनिबंधक. 
 
विधवांची गैरसोय 
सरकारीकुटुंबाच्या व्याख्येत पती, पत्नी मुले यांचा समावेश आहे. अर्ज भरताना पती, पत्नीची माहिती भरताना दोघांचेही थम्ब आवश्यक आहेत; अन्यथा संगणक अर्ज स्वीकारत नाही. मृत व्यक्तीचे थम्ब कोठून आणायचे, असा प्रश्न आहे. त्यामुळे विधवा शेतकऱ्यांची मोठी अडचण या प्रक्रियेत झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...