आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युतीला मदतीसाठी मनसे सरचिटणीसांची सूचना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापौर निवडणुकीला अवघे दोन दिवस उरले आहेत. युती-आघाडीने नगरसेवकांची पळवापळवी करत महापौरपदावर दावा केला आहे. असे असले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चार नगरसेवक या निवडणुकीत किंगमेकर ठरणार आहेत. चारही नगरसेवक सध्या आघाडीच्या गटात आहे. मात्र, चारही नगरसेवकांनी युतीचे उमेदवार सचिन जाधव यांनाच मतदान करावे, विराेधात मतदान केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, अशी सूचना पक्षाचे सरचिटणीस शिरीष सावंत यांनी गटनेते गणेश भोसले यांना शुक्रवारी केली आहे.
मनसेच्या घटनेनुसार व्हिप (पक्षादेश) काढण्याचा अधिकार फक्त भोसले यांनाच आहे.
दरम्यान, मनसेचे नगरसेवक राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीबरोबर असल्याने ते ही सूचना पाळण्याची शक्यता अतिशय कमी आहे. आमदार संग्राम जगताप यांनी महापौरपदाचा राजीनामा देताच शिवसेनेने जोरदार मार्चेबांधणी करत महापौरपदावर दावा केला. भाजपच्या नगरसेवकांना बरोबर घेत आघाडीतील काही नगरसेवकांना फोडण्यातही त्यांना यश मिळाले. काही अपक्ष नगरसेवकही त्यांच्याबरोबर सहलीला आहेत. विशेष म्हणजे, मनसेला बराेबर घेण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मुंबईहून फिल्डिंग लावली. मनसेच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून मनसेला बरोबर घेण्यात अखेर त्यांना यश आले.मनसेचे सरचिटणीस सावंत यांनी गटनेते भोसले यांना तशी कडक सूचना करणारे पत्र पाठवले आहे.
या पत्रात त्यांनी भोसले यांना युतीला मदत करण्याचा ‘व्हिप’ काढण्याची सूचना केली आहे. युतीचे महापौरपदाचे उमेदवार जाधव यांना मतदान केल्यास महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण अनर्हता नियम १९८६ अधिनियम १९८७ नुसार कठोर कारवाई करण्याचा इशाराही सावंत यांनी पाठवलेल्या पत्रात देण्यात आला आहे. मात्र, मनसेचे नगरसेवक सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी आघाडीबरोबर असल्याने या सूचनेला प्रतिसाद मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याची जोरदार चर्चा मनपाच्या राजकीय वर्तुळात आहे.
पक्षाचा आदेश आल्यानंतरच युती की आघाडी, याबाबत निर्णय घेऊ, असे गटनेते भोसले यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. परंतु पक्षाने युतीबरोबर राहण्याचे आदेश दिल्याने मनसे नगरसेवकही कोंडीत सापडले आहेत. आतापर्यंत आघाडीला साथ देत स्थायी समितीचे महत्त्वाचे सभापतिपद कायम ठेवण्यात मनसे नगरसेवकांना यश मिळाले. विशेष म्हणजे, तेव्हा पक्षच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याबद्दल कोणताही विरोध केला नाही. चार नगरसेवक असताना मनसेच्या नगरसेवकांना स्थायीच्या अध्यक्षपदासारखे मोठे पद मिळाले.
आता शिवसेनेने देखील त्यांना हे पद कायम ठेवण्याची ऑफर दिलेली आहे. त्यामुळे मनसे नगरसेवकांचे पाचही बोटे सध्या तुपात आहेत. युती असाे की आघाडी लाभ मनसे नगरसेवकांचाच होणार आहे. दरम्यान, पक्षादेश पाळणार की आघाडीबरोबर जाणार, याबाबत विचारणा करण्यासाठी भोसले यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पक्षाचा सूचनावजा आदेश मिळाला असला, तरी मनसे नगरसेवकांची भूमिका आठ जूनला होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीतच स्पष्ट होईल.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, मनसेच्या गटाची घटनाच स्वतंत्र...