आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आलमगीरचे नवे संग्रहालय पाहण्याची रविवारी संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जगातील सर्वात मोठ्या साम्राज्याचा धनी होण्याचा मान मिळालेला आैरंगजेब बादशहा फेब्रुवारी १७०७ मध्ये नगर मुक्कामी मरण पावला. त्याच्या पार्थिवाला जिथे स्नान घालण्यात आले, ते स्थळ "आलमगीर' म्हणून ओळखले जाते. तेथे नव्याने उभारलेले संग्रहालय व दुर्मिळ ग्रंथसंपदा पाहण्याची संधी नगरकरांना येत्या रविवारी (८ फेब्रुवारी) सकाळी १० वाजता मिळणार आहे. हा उपक्रम सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य आहे.

नगर शहराच्या ५२५ व्या स्थापना वर्षाचे आैचित्य साधून "दिव्य मराठी'च्या वतीने दर महिन्यात "सिटी वॉक' उपक्रम आयोजित करण्यात येतो. या निमित्ताने नगर शहरातील ऐतिहासिक, तसेच महत्त्वाच्या अन्य स्थळांची ओळख करून घेतली जाते. येत्या रविवारी नगर-पाथर्डी रस्त्यावरील भिंगारच्या पुढे असलेल्या आलमगीर परिसरात "सिटी वॉक' आयोजित करण्यात आला आहे.

साम्राज्य विस्तारासाठी दख्खनमध्ये आलेला औरंगजेब निराश होऊन परत जाताना तेरा महिने त्याची छावणी भिंगारजवळ होती. बादशहाने अखेरचा श्वास इथेच घेतला. पार्थिवाला येथे स्नान घालून त्याच्या इच्छेप्रमाणे दफन खुलदाबाद येथे करण्यात आले.

इतिहासाला कलाटणी
औरंगजेबाचा मृत्यू ही भारतीय इतिहासातील अतिशय महत्त्वाची घटना मानली जाते. हा इतिहास आणि आलमगीर परिसराची माहिती जाणून घेण्यासाठी रविवारी सकाळी १० वाजता आलमगीर येथे येण्याचे आवाहन "दिव्य मराठी'च्या वतीने करण्यात आले आहे. मौलाना अख्तर कासमी, शेख हुल हदीस, माैलाना कादीर नाजीज, सय्यद फहीम सर, तसेच आलमगीर मदरसा व दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष शकूर शेख यावेळी माहिती देणार आहेत. "सिटी वॉक'संबंधी अधिक माहितीसाठी भूषण देशमुख (मोबाइल ९८ ८१ ३३ ७७ ७५) यांच्याशी संपर्क साधावा.