आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Oppose Pachapute In Committee Meeting MLA Rahul Jagatap

पाचपुते यांना समितीच्या बैठकीत बसू देणार नाही, आमदार राहुल जगताप यांचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विसापूर चारीचे काम स्वखर्चाने केल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांसमोर बोलताना आमदार राहुल जगताप. समवेत राजेंद्र नागवडे, अण्णासाहेब शेलार आदी. छाया: अर्शद शेख
श्रीगोंदे - विसापूर खालील पाच गावांना 'कुकडी'च्या चारी क्रमांक ४५ मधून पाणी देण्यात माजी मंत्री बबनराव पाचपुते खोडा घालत आहेत. कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत त्यांना बसण्याचा अधिकार नाही. यापुढे त्यांना या बैठकीत बसू दिले जाणारा नाही, असा इशारा आमदार राहुल जगताप यांना दिला.

विसापूर मधील चारी क्रमांक ४५ची स्वखर्चाने दुरुस्ती करून कुकडी कालव्याद्वारे थेट गावांना पाणी मिळण्यासाठी आमदार राहुल जगताप यांनी मोहीम सुरू केली. त्यांच्या या प्रयत्नांना पाटबंधारे विभागाने बेकायदा घोषित केले. त्या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी जगताप यांनी या चारीवर शेतकऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी तालुक्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती सखाराम जगताप होते.

जगताप म्हणाले, विसापूर खालील पाच गावे महिन्यांपासून तहानलेली आहेत. या गावांना पाणी मिळावे म्हणून मी स्वतः स्वखर्चाने चारीचे काम हाती घेतले. पाचपुतेंनी या विरोधात राज्य सरकारकडे तक्रार केली. म्हणून 'कुकडी'चे आवर्तन लांबले. चारी केली म्हणून मला तुरुंगात टाकले, तरी मी आनंदाने जाईल. मात्र, अधिकार नसताना पाचपुते, जर कुकडी कालवा समितीच्या बैठकीत येऊन या चारीला विरोध करणार असतील, तर त्यांना तेथे बसू दिले जाणारा नाही.

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, आमदारकी नंतर तालुक्यात झालेल्या विविध निवडणुका अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा यांनी छुपी मदत केल्यानेच पाचपुतेंनी डोके वर काढले आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार म्हणाले, राजेंद्र नागवडे घोड प्रकरणी लवादाकडे गेल्यावर तेथे देखील पाचपुतेंनी हस्तक्षेप केला. ज्येष्ठ नेते कुंडलिकराव जगताप म्हणाले, विधानसभेच्या वेळी असणारी पाचपुते विरोधातील वज्रमूठ ढिली झाल्याने ते कुरघोडी करू लागले आहेत. एकी कायम ठेवा. श्रीगोंदे बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा म्हणाले, विसापूर खालील गावातून आमदार जगताप, अण्णासाहेब शेलार आपल्याला जनतेने मताधिक्य दिल्यानेच त्याचा वचपा काढण्यासाठी पाण्यात खोडा घालण्याचे काम पाचपुते करीत आहेत. यावेळी गावांतील अनेक शेतकरी उपस्थित होते.

या मेळाव्यास "कुकडी'चे संस्थापक कुंडलिकराव जगताप, आमदार राहुल जगताप, 'नागवडे'चे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती बाळासाहेब नाहाटा, विश्वास थोरात, संभाजी देवीकर, कल्याण जगताप, अख्तर शेख, भरत नाहाटा आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.

हुतात्मा होण्याचा मनसुबा
आमदार राहुल जगताप कायदा हाती घेऊन पाणी वितरण व्यवस्था मोडीस काढताहेत.तेथील लाभार्थ्यांना यापूर्वीही पाणी मिळतच होते ना? त्यांच्या पवित्र्याने 'कुकडी'चे आवर्तन लांबले, तर त्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी. मी सरकारकडे तक्रार केल्याचे जगतापांनी सिद्ध करावे. कायदेशीर व्यवस्थेवर दरोडा टाकून, जर कारवाई झाली, तर हुतात्मा व्हायचा त्यांचा मनसुबा आहे. बबनराव पाचपुते,माजी मंत्री.

फौजदारी कारवाई करू
पाण्यासाठी बेकायदेशीरपणे कुकडी कालव्यातून चारी काढल्याप्रकरणी बेलवंडी पोलिसांकडे आम्ही याआधीच अर्ज दिला होता. कायदा हाती घेऊन कालव्यास नुकसान पोहोचवणारांविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल. यात सहभागी व्यक्ती कितीही मोठी असली, तरी त्यांची गय करणार नाही. कायदा आपले काम करेल. सु.ना. कोळी, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे, विभाग २.