आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Oppose Sound In Nagar, Nashik Over Releasing Water In Jayakwadi Dam

हक्कावर गदा: जायकवाडी धरणात पाणी सोडण्‍यावरून नगर, नाशकात विरोधी सूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोपरगावमध्ये आमदार बिपिन कोल्हेंच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. - Divya Marathi
कोपरगावमध्ये आमदार बिपिन कोल्हेंच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.
अहमदनगर/ नाशिक - जायकवाडी धरणात वरच्या धरणांतून हक्काचे पाणी सोडण्याचा निर्णय होताच अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील राजकारण्यांनी शेतकऱ्यांना फूस लावून थयथयाट सुरू केला आहे. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव येथे या निर्णयाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, तर नाशिकमध्ये गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. पाणी सोडल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नगर आणि नाशिक जिल्ह्यात नियमांचे उल्लंघन करून १३ धरणे बांधण्यात आल्याने ऊर्ध्व भागात चांगला पाऊस होऊनही जायकवाडीत पाणीच येईनासे झाले आहे. त्यामुळे समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार या वरच्या धरणांत बेकायदेशीररीत्या अडवण्यात आलेल्या पाण्यापैकी १२. ८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला. हा निर्णय होताच मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारणाऱ्या नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना फूस लावून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी थयथयाट करण्यास सुरुवात केली आहे.

भंडारदरा व निळवंडेसह दारणा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णयाच्या निषेधार्थ सोमवारी श्रीरामपूर, संगमनेर व कोपरगाव येथे आंदोलन करण्यात आले. श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे व आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली नेवासे रस्त्यावर बाजार समिती नजिक रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच संगमनेर येथे काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तहसीलवर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. कोपरगावमध्ये आमदार स्नेहलता कोल्हे व बिपीन कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.

श्रीरामपूर येथे रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या निवडक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून सोडून दिले. यावेळी माजी आमदार जयंत ससाणे, आमदार भाऊसाहेब कांबळे, जी. के. पाटील, सचिन गुजर, नानासाहेब पवार, अण्णासाहेब थोरात, रमादेवी धिवर, मुरली राऊत, प्रकाश ढोकणे, सुरेखा कासार आदींनी भाषणे केली. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याप्रकरणी याचिका दाखल केली जाणार असून जायकवाडीत पाणी जाऊ दिले जाणार नाही, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागेल. सोडलेले पाणी जाण्यास मोठा कालावधी लागेल. तालुक्याचे वाळवंट करणारा हा निर्णय आहे. नेत्यांची अडचण करण्याचा सरकारचा डाव आहे, असे यावेळी जयंत ससाणे यांनी सांगितले. आंदोलकांच्यावतीने तहसीलदार किशोर कदम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

संगमनेर येथे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विराट मोर्चा व निदर्शने करून पाणी सोडण्यास तीव्र विरोध नोंदवण्यात आला. मोर्चा नेहरू गार्डन, बाजार पेठ, शिवाजी पुतळा, नवीन नगर रोड मार्ग, प्रांत कार्यालय येथे आला. यावेळी प्रांतधिकारी संदीप निचित यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, अॅड.माधवराव कानवडे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, बाबा ओहोळ, राष्ट्रवादीचे आबासाहेब थोरात, भाजपचे राधावल्लभ कासट, शिवसेनेचे कैलास वाकचौरे, लक्ष्मण कुटे, शिवाजीराव थोरात, रामदास वाघ, दिलीप पुंड, आर. बी. राहणे, संपतराव डोंगरे, शंकराव खेमनर, पांडुशेठ घुले, भाऊसाहेब कुटे, लहानभाऊ गुंजाळ, खेमचंद निहानी आदी उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.
पुढे वाचा.. न्यायालयात जाणार