आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पाथर्डी - सत्तर हजार कोटी रुपये जलसंधारणाच्या कामात जिरवणार्या शासनाला राज्यात पडलेल्या दुष्काळाचे कोणतेही गांभीर्य नाही. चालू अधिवेशनातच छावणीतील जनावरांना पुरेसा चारा व जनावरामागे शंभर रुपये अनुदान देण्यासाठी सरकारला भाग पाडू, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी दिली.
तालुक्यातील करंजी परिसरातील रोहयोच्या कामाची व जनावरांच्या छावण्यांची पाहणी गुरुवारी खडसे यांनी केली. या नंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार राम शिंदे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, अभय आगरकर, मोहन पालवे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पवार, रफिक शेख, डॉ. मृत्युंजय गज्रे आदी उपस्थित होते. आमदार कर्डिले यांनी या वेळी छावणीतील जनावरांना शंभर रुपयांप्रमाणे अनुदान द्यावे, मुळा धरणातून पाणी सोडावे, सक्तीची वीजबिल वसुली थांबवण्यासाठी विधानसभेत मागणी करावी या संदर्भात निवेदन खडसे यांना दिले. खडसे म्हणाले, शासनाची नियतच चांगली नाही. अगोदर 80 रुपये जनावरामागे देणारे शासन स्वस्ताई नसतानाही नंतर साठ रुपये अनुदान देत आहे. जनावरे व माणसे छावणीत एकत्र राहतात. जनावरांना केवळ पंधरा किलो चारा देण्याऐवजी आवश्यक तेवढा चारा द्यायला हवा. ज्या शेतकर्यांच्या हाताला काम नाही, त्यांना बेरोजगार भत्ता द्यावा. सरकार निर्णय घेते, पण कोणाच्याच पदरात काहीच पडत नाही. शेतकर्यांकडून चारातगाई शासनाला घेऊ देणार नाही. ग्रामीण विद्यार्थ्यांची फी माफ करू, अशी घोषणा शासनाने केली. पण केवळ दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचीच फी माफ केली. इंजिनिअरिंग व वैद्यकीय शिक्षण घेणार्यांची फी मात्र माफ केली नाही, असा आरोपही खडसेंनी केला. या वेळी ढवळेवाडी येथील एका महिलेने सहा महिने रोहयोचे काम करूनही मजुरी दिली नसल्याचे निदर्शनास आणून देताच, खडसे यांनी संबंधित अधिकार्याला घरी पाठवू, असे आश्वासन दिले. प्रास्ताविक भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी, तर आभार शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल कराळे यांनी मानले. या वेळी मोठय़ा संख्येने शेतकरी उपस्थित होते.
शेतकर्यांना कर्जमुक्त व वीजबिल माफ करू
शेतकर्यांना शून्य टक्केव्याजदराने कर्ज देऊ, असे म्हणणार्या शासनाने कर्ज, तर दिलेच नाही. उलट दिलेल्या कर्जमाफीत घोटाळा केला. आगामी निवडणुकीत सत्तापालट केल्यास शेतकर्यांना कर्जमुक्त करून वीजबिल सुद्धा माफ केले जाईल, असे आश्वासन खडसे यांनी यावेळी दिले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.