आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्हैयाकुमारच्या व्याख्यानास हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध, कन्हैया देशद्रोही व्यक्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - बंडखोर विचारसरणीचा, ऑल इंडिया स्टुडंन्टस् फेडरेशनचा (एआयएसएफ) नेता कन्हैयाकुमार याचे रविवारी संगमनेरमधील व्याख्यान वादात सापडण्याची चिन्हे आहेत. या व्याख्यानास प्रशासनाने परवानगी देऊ नये, अशी मागणी भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्ववादी संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे.
 
तहसीलदार साहेबराव सोनवणे शहर पोलिसांना भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने याबाबत निवेदन देण्यात आले आहे. देशद्रोहाचे आरोप असलेल्या कन्हैयाकुमार याच्या व्याख्यानास परवानगी दिली जाऊ नये, असे नमूद करून निवेदनात म्हटले आहे, ‘भारत तेरे तुकडे होगे’ अशा देशद्रोही घोषणा देताना कन्हैयाकुमार टीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाला आहे. विद्यार्थिनीसमोर लघुशंका करून त्यांना धमकावल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. अशा देशद्रोही आणि असभ्य व्यक्तीची सभा, व्याख्यान आयोजित करणे चुकीचे अाहे. यापूर्वी जामिनावर सुटलेले कबीर कला मंचचे पूर्वाश्रमीचे नक्षलवादी, आदिवासी विद्यार्थी मेळाव्यास आलेले वामपंथी आणि आता कन्हैयाकुमार, या सभांच्या साखळीमागे प्रचलित लोकशाही व्यवस्था प्रशासनाविरोधात जनतेला भडकावणे असे नक्षलवादी सूत्र आहे.
 
कन्हैयाकुमारला संगमनेरात येऊ दिल्यास येथे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे त्याच्या व्याख्यानास परवानगी नाकारली जावी. प्रशासनाने जर परवानगी दिली असेल, तर ती मागे घेतली जावी. या व्याख्यानामुळे राष्ट्रवादी नागरिक आणि कन्हैयाकुमार समर्थकांत संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या संघर्षातून शहरात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला संयोजक जबाबदार असतील, असे निवेदनात म्हटले आहे. भाजपचे नेते राम जाजू, शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, तालुकाप्रमुख काशिनाथ पावसे, सुदाम आेझा, स्वामी जंगम, तुषार ठाकूर, शिवसेनेचे नगरसेवक लखन घोरपडे, मयूर शेलार, समीर आेझा, दीपेश ताटकर, सुनील खरे, दिनेश सोमाणी आदी निवेदन देताना उपस्थित होते.
 
आयुष्याच्या शेवटपर्यंत कष्टकरी, कामगार शेतकऱ्यांसाठी आयुष्य वेचलेले कॉम्रेड दत्ता देशमुख यांच्या शताब्दी वर्षानिमित्त आणि २३ व्या स्मृतिदिनी येत्या रविवारी (५ नोव्हेंबर) कन्हैयाकुमारचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. मालपाणी लॉन्स येथे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड दत्ता देशमुख जन्मशताब्दी सल्लागार समितीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात असतील. आमदार डॉ. सुधीर तांबे, सीपीआयचे राज्य सचिव कॉम्रेड भालचंद्र कांगो, मिलिंद रानडे, दत्ता देशमुख विचारमंचाचे अध्यक्ष एम. व्ही. जोगळेकर यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन देशमुख यांनी दिली. भाजपने विरोध केला असला, तरी संयोजक या कार्यक्रमाची जय्यत तयारी करत आहेत.
 
कॉम्रेड देशमुखांनी दिली कृषी क्षेत्राला नवी दिशा
१९४६ते १९६२ पर्यंत कॉम्रेड दत्ता देशमुख यांनी आमदार म्हणून संगमनेरचे प्रतिनिधीत्व केले. ६२ च्या निवडणुकीत पराभव बघाव्या लागलेल्या दत्तांनी नंतरच्या काळात राजकारणापासून दूर जात दुष्काळी महाराष्ट्राच्या प्रश्नाचा अभ्यास करत त्यावर काम केले. दुष्काळ निवारण निर्मूलन, रोजगार हमी योजना आखण्यात त्यांचा पुढाकार राहिला. शेती पाणी या कळीच्या मुद्द्यावर त्यांनी मोठे काम करताना राज्याच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली. कामगार, शेतकऱ्याचे नेते, साम्यवादी विचारवंत, पाणी व्यवस्थापनाचे तज्ज्ञ, लाल निशाण पक्षाचे अभ्यासू नेते म्हणून ते ओळखले जात.
 
बातम्या आणखी आहेत...