आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीच्या बैठकीत पिचडांच्या विरोधात सूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - आम्ही तालुक्यात आमदार बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि राष्ट्रवादीचेच माजी मंत्री मधुकर पिचड या तीन बलाढ्य शक्तींविरोधात लढतो. पण कमी पडतो. याला काही पक्षातील नेतेच जबाबदार असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री पिचड यांच्याकडे अंगुलीनिर्देश करत केला. तालुक्यात आम्ही तीन बलाढ्यांविरोधात लढतो. मात्र, पक्षीय पातळीवर दखल घेतली जात नाही, अशी नाराजी कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्यासमोर व्यक्त केली.

घुले संगमनेरला आले होते. राष्ट्रवादी तालुका कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक झाली. जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप शिंदे, उपाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, सरचिटणीस सोमनाथ धूत, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अमोल खताळ, युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष शौकत जहागीरदार, पंचायत समिती सदस्य सरूनाथ उंबरकर, युवकचे तालुकाध्यक्ष अशोक कानवडे, रौफ शेख, राष्ट्रवादी युवतीच्या अमृता काेळपकर आदी उपस्थित होते. जी ताकद लागेल ती देतो पराभव झाला, तरी चालेल पण निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार उभे करा, असा सल्ला जिल्हाध्यक्ष घुले यांनी कार्यकर्त्यांना दिला.
कार्यकर्त्यांचा समूह तयार व्हायला हवा त्याचा ग्रामपंचायत, बाजार समिती, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत फायदा होईल. मात्र, वरिष्ठ पातळीवर पक्षाचे नेते स्थानिकांशी सेटलमेंट करत असतील, तर तालुक्यात पक्ष वाढणार कसा, संगमनेरचे प्रभारी तालुकाध्यक्ष पिचड यांना करून टाका, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

ताकद द्या, अल्पसंख्याक पक्षासोबत राहील
विधानसभानिवडणुकीत उमेदवार आबासाहेब थोरात यांच्याविराेधात साटेलोटे करून आम्हा कार्यकर्त्यांना बदनाम केले गेले. पक्षाचे पदाधिकारी सोबत रहात नसल्याने अनेकवेळा हिंदू-मुस्लिम वादात आमच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. ताकद मिळाली, तर अल्पसंख्याक समाज निश्चितच पक्षासोबत राहील.'' शौकतजहागीरदार, जिल्हाध्यक्ष, अल्पसंख्याक.

जिल्हाध्यक्षांनी आम्हाला ताकद द्यावी
थोरात,विखे पिचड या नेत्यांच्या नियंत्रणाखाली हा तालुका आहे. त्यामुळे पक्षवाढीसाठी कसरत करावी लागते, तरी आमचे काम सुरू आहे. लोकांची कामे करून घेण्यात आम्हाला शासकीय स्तरावर अडचणी येत नाहीत. मात्र, काही ठिकाणी अडवणूक होत असल्याने जिल्हाध्यक्षांनी आम्हाला ताकद द्यावी. आबासाहेब थोरात, तालुकाध्यक्ष.

पाया भक्कम असेल, तर पक्ष उभा राहील
प्रतिकूल परिस्थितीत येथील पदाधिकारी सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करत आहे. तुम्ही पायाचे दगड आहात. पाया भक्कम असेल, तर पक्ष उभा राहील. काळजी करू नका, जी ताकद हवी ती देतो. शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीजबिल माफी, विद्यार्थ्यांच्या फी माफीसाठी जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा काढू. चंद्रशेखरघुले, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

संगमनेरमध्ये राष्ट्रवादीच्या बैठकीत बोलताना जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले.

वरिष्ठांमुळे आमचे हात बांधले जातात
संगमनेरशी संबंधित कोणताही निर्णय पिचड यांच्याकडे जातो, त्यामुळे अडचण होते. वरच्या पातळीवर सेटलमेंट होत असेल, तर काम आणि पक्षाला काहीही किंमत नाही. वरिष्ठांच्या निर्णयामुळे आमचे हात बांधले जातात. पिचड यांनाच तालुकाध्यक्ष करा, नाहीतर संगमनेरशी संबंधित निर्णय कार्यकर्त्यांना विचारून व्हायला हवा.'' सरूनाथउंबरकर, सदस्य, पंचायत समिती.
बातम्या आणखी आहेत...