आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवयवदान केल्याने अजरामर होण्याची संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - देशभरात दरवर्षी पाच लाख रुग्ण अवयव न मिळाल्याने मृत्युमुखी पडतात. अवयवदानातून या रुग्णांना वाचवता येणे सहजशक्य आहे. अवयवदानातून अजरामर होण्याची संधीही लाभते, असे प्रतिपादन अवयवदान समन्वयक सतीश अहिरे यांनी केले.

अवयवदान दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात आयोजित जनजागृतीपर कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक एस. एम. सोनवणे, नेत्रचिकित्सक डॉ. जे. एम. मुंडे, डायलेसिस विभाग तंत्रज्ञ अविनाश घोगरे, कैलास भंवर आदी उपस्थित होते.

अहिरे म्हणाले, व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे विविध अवयव गरजू रुग्णांना दान करण्यास संमती देणे म्हणजेच अवयवदान होय. डोळे, हृदय, किडनी, त्वचा, यकृत, आतडी, फुप्फुस, मुत्रपिंड, स्वादूपिंड, हाडे आदी अवयव दान करता येतात. अवयव न मिळाल्याने देशभरात दरवर्षी पाच लाख रुग्णांना जीव गमवावा लागतो. दीड लाख रुग्णांना किडनीची आवश्यकता असते. मात्र, अवघ्या पाच हजार रुग्णांना किडनी मिळू शकते. 10 लाखांपेक्षा अधिक रुग्णांना डोळ्यांची आवश्यकता असते. यातील केवळ आठ हजार रुग्णांना डोळे मिळतात. दरवर्षी फक्त एक हजार अवयवदान होतात. लोकसंख्येच्या केवळ पाच टक्के नागरिकांनी अवयवदान केल्यास गरज पूर्ण होऊ शकते.

देशात 95 हजार ब्रेनडेड रुग्ण आहेत. मात्र त्यांच्याकडून होणारे अवयवदानाचे प्रमाणही नगण्य आहे. अवयव दान करू इच्छिणार्‍यांनी पुण्याच्या विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राकडे 9822027023 तर नेत्रदान करू इच्छिणार्‍यांनी 9226398194 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अहिरे यांनी केले. त्यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयातील डायलेसिस विभाग, नेत्रकक्ष, ओपीडी, रुग्णालय परिसरात उपस्थित रुग्ण व नातेवाइकांना अवयवदानासंबंधी माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले.

अवयव, नेत्रदानासाठी स्वेच्छेने पुढाकार घेण्याची गरज
अवयव, नेत्रदान करण्यासाठी नागरिकांनी स्वेच्छेने पुढाकार घेण्याची गरज आहे. मृत्युपुर्वी संकल्पपत्र, संमतीपत्र भरून संबंधित यंत्रणांकडे द्यावे. मृत्यूनंतर नातेवाइकांनी या यंत्रणांना तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सोनवणे व नेत्रशल्यचिकित्सक डॉ. मुंडे यांनी केले आहे.
फोटो - अवयवदानानिमित्त जनजागृतीसाठी जिल्हा रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात प्रत्यारोपण समन्वयक सतीश अहिरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एम. सोनवणे, नेत्रचिकित्सक डॉ. जे. एम. मुंडे आदी.