आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Our Ministers Also Not Do Work, Shiv Sena\'s MLAs Meeting In Mumbai

आपलेही मंत्री कामे करत नसल्याची तक्रार, सेनेच्या आमदारांची मुंबईत बैठक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सत्तेत असूनही कामे होत नसल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांची मंगळवारी मुंबईत बैठक घेतली. यात मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंत्र्यांविरोधात तक्रार अपेक्षित होती. मात्र प्रत्यक्षात तेथे भाजप मंत्र्यांबरोबरच शिवसेनेचे जेथे पालकमंत्री आहेत तेथेही काम होत नसल्याचीही तक्रार करण्यात अाली असल्याचे या बैठकीतील सूत्रांनी सांगितले. आपल्याच आमदारांनी लक्ष्य केल्याने मंत्र्यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांकडेच बोट दाखवल्याचे समजते.

सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांनी शिवसेना सत्तेत सहभागी झाली असली तरी पहिल्याच दिवसापासून भाजपचे मंत्री काम करू देत नाही, अशी ओरड करण्यात येत होती. त्याचबरोबर राज्यातील दोन महानगरपालिकांच्या निवडणुकीत दोन्हीही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले. त्यामुळे दबाव तंत्राचा भाग म्हणून शिवसेनेच्या आमदारांची मंगळवारी मुंबईत सेना भवनात उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. याकडे शिवसेनेसह भारतीय जनता पक्षाचेही लक्ष लागले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या सर्वच मंत्र्यांवर आरोप झाले. एकही काम ते करत नाही, असा सर्वांचाच सूर होता. मात्र त्याचबरोबर अनपेक्षितपणे काही आमदारांनी आपलेही मंत्री काम करत नाहीत, अशा तक्रारीचा सूर लावला. काही ठिकाणी आपले पालकमंत्री आहेत, तेही कामे करत नाही, असे उद्धव यांना सांगण्यात आले. सेनेच्या मंत्र्यांनीही यासाठी भाजपच जबाबदार असल्याचे सांगितले अन् यापुढे जोर लावू, पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. शिवसेना भाजपवर नाराज असल्याचे जगजाहीर आहे. त्यातच आता सेनेचे आमदारही स्वपक्षीय मंत्र्यांवर नाराज असल्याचे या निमित्ताने समोर आले.