आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृतज्ञतेचा सण पोळा, त्यांच्यावर पसरली शोककळा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अन्नदात्या बळीराजाच्या शेतात वर्षभर राबणाऱ्या सर्जा-राजाचा सन्मान करणारा, दरवर्षी पिठोरी दर्श अमावास्येला येणारा पोळ्याचा सण जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला. पण नगर शहरातील सुडके मळ्यातील बाळासाहेब सुडके यांच्या कुटुंबीयांसाठी मात्र पोळा म्हणजे काळा दिवस ठरला. रस्त्यावर साचलेल्या पाण्यात उतरलेल्या विजेच्या प्रवाहाने त्यांच्या लाडक्या "राधा' गायीचा बळी घेतला. त्यामुळे सोमवारी दिवसभर सुडके मळा परिसरात शोककळा पसरली होती.
सुडके मळा परिसरात राहणारे बाळासाहेब सुडके यांचे सहा सदस्यांचे कुटुंबीय. सुडके मळा परिसरात त्यांची बागायत शेती व जनावरांचा गोठाही आहे. गेल्या तीन वर्षांपासून राधा गायीने या कुटुंबीयांना चांगलाच लळा लावला होता. सोमवारी पोळ्याच्या सणानिमित्त योगेश बाळासाहेब सुडके पहाटे साडेपाच वाजता उठले. राधाला अंघोळ घालण्यासाठी ते निघाले. पण रस्त्यातील खड्ड्यांत साचलेल्या पाण्यात वीजवाहक तार पडून त्यात विद्युतप्रवाह उतरला होता. पाण्यातून जाताना राधेला विजेचा धक्का बसला. राधाचे दावं हातात असलेल्या योगेशलाही विजेचा सौम्य धक्का जाणवला. त्यांच्यासमोरच राधाने आपला जीव सोडला.
ऐन पोळ्याच्या सणाच्या दिवशी घरातील सर्वांना लळा लावलेली गोमाता देवाघरी गेल्यामुळे सुडके कुटुंबीयांसह परिसरात सर्वांनाच दु:ख अनावर झाले. सुडके कुटुंबीयांवर तर शोककळा पसरली. योगेशसह परिसरातील नागरिकांच्या जीवावर आलेल्या संकटाला गोमाता राधा स्वत: सामोरी गेली, अशीच चर्चा परिसरात होती. ही घटना समजल्यानंतर आमदार अनिल राठोड यांनी सुडके कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन केले.
महावितरणची दिरंगाई
महापालिकेच्या वतीने बालिकाश्रम रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे खोदकाम सुरू असताना महावितरणची भूमिगत केबल तुटली. महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे ही केबल केवळ जमिनीखाली गाडण्यात आली. रविवारी झालेल्या पावसामुळे परिसरात पाणी साचले व तुटलेल्या तारेमुळे त्या पाण्यात विद्युतप्रवाह उतरला. सोमवारची घटना महावितरणला कळवण्यात आली. परंतु यावेळीही दोन तास उशिरा येऊन महावितरणने सुडके मळा परिसरातील नागरिकांच्या जखमेवर आणखी मीठ चोळले...