आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pachpute Not Interfere In Cooperative Sector Nagwade

पाचपुते यांनी सहकार क्षेत्रात लुडबुड करू नये, नागवडे यांची टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे - सहकार चळवळीला विरोध असणाऱ्या बबनराव पाचपुते यांनी खासगी साखर कारखाने काढले. आता ते सहकारी कारखानदारीत हस्तक्षेप करीत आहेत, त्यांनी येथे लुडबुड करू नये, अशी टीका नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनी सोमवारी येथे पत्रपरिषदेत बोलताना केली.

नागवडे म्हणाले, 'पाचपुतेंनी दोन खासगी कारखाने काढले. त्यांना आमचा विरोध नाही. हवे तर त्यांनी अजून दोन कारखाने काढावेत. सहकाराला विरोध करणाऱ्यांनी सहकार चळवळीत डोकावू नये. सहकाराविषयी पाचपुतेंना एवढे प्रेम होते, तर त्यांनी सहकारी कारखाना का काढला नाही? पाचपुतेंच्या ताब्यात कारखाना असताना त्यांनी झाडे लावली गेट बांधल्याचे सांगतात, तेवढ्याने कारखान्याचा विकास कसा काय होतो.

शैक्षणिक संस्थेमध्ये गैरव्यवहार प्रकरणी पाचपुतेंच्या आरोपाला उत्तर देताना नागवडे म्हणाले, आमच्या सर्व संस्थांमध्ये मिळून साडेतीन हजार कर्मचारी आहेत. एकालाही मी आयुष्यात कधी पैसे मागितले नाहीत. साखर कारखानदारीत जनतेने ४० वर्षे विश्वास ठेवला. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. यावेळी नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब गिरमकर, प्रशांत दरेकर, धना पाटील, गणपतराव जंगले, योगेश भोयटे आदी उपस्थित होते.

तर व्यापारी संकुलाला पाचपुतेंचे नाव का?
काष्टीयेथील श्रीगोंदे बाजार समितीच्या व्यापारी संकुलास 'नामदार बबनराव पाचपुते' हे नाव देणे पाचपुतेंना चालते. मग श्रीगोंदे कारखान्याबाबत त्यांची पोटदुखी का आहे. नामांतरास मी विरोध केला असताना सर्वसाधारण सभेने दोनवेळा ठराव करुन नामांतरास पाठिंबा दिला. या ठरावास पाचपुतेंनी तेव्हा पाठिंबा दिला होता, मग आताच त्यांना अस्मिता कशी आठवली? केवळ श्रीगोंदेच नव्हे, तर राज्यातील ३६ साखर कारखान्यांचे नामांतर झाले आहे. हे त्यांनी लक्षात घ्यावे, असेही नागवडे म्हणाले.