आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाडव्याच्या खरेदीला दुष्काळाचा फटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मराठी नववर्षाचे शुक्रवारी घरोघरी गुढी उभारून उत्साहात स्वागत करण्यात आले. वाहन बाजारात खरेदी करणारा प्रमुख ग्राहक शेतकरी आहे. त्यामुळे दुष्काळाचा परिणाम वाहनबाजारावर दिसत होता. मागील वर्षीच्या तुलनेत २५ ते ५० टक्क्यांनी विक्रीत घट झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. तथापि, दिवसभरात मागील बुकिंगमुळे सुमारे ३० कोटींहून अधिक उलाढाल झाली. सराफ बाजार बंद असल्याने त्याचा उलाढालीवर परिणाम झाला.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला घरोघरी आनंदाची आणि सुख समृद्धीची गुढी उभारण्यात आली. गुढीची पूजा करून गोडधोडाचा नैवद्य दाखवण्यात आला. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, तसेच नव्या उपक्रमांचा प्रारंभ केला जातो. शुक्रवारी वाहन बाजारात मोठी गर्दी झाली होती. अनेकांनी घराचे स्वप्न साकारण्याचा मुहूर्त साधला. काही हौशीमंडळींनी आवडते वाहन महिनाभरापूर्वीच बुक करून पाडव्याच्या मुहूर्तावर घरी नेली.
वाहनबाजारातला प्रमुख ग्राहक शेतकरी वर्ग असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. सध्या दुधाला भाव नाही, शेतमालही दुष्काळामुळे हाताशी आलेला नाही. त्यामुळे उत्पन्न घटून शेतकऱ्यांकडेच पैसा उरलेला नाही. मागील वर्षीप्रमाणे यंदाही हवामानाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्याला बसला. त्याचा परिणाम मोटारसायकल बाजारावर ठळकपणे जाणवला. तथापि, चारचाकी वाहन खरेदीसाठी बऱ्यापैकी प्रतिसाद असल्याचे वाहन विक्रेत्यांचे म्हणणे आहे. रेनॉल्टची क्विड, डस्टर, मारुतीची स्विफ्ट डिझायर, अल्टोला चांगली मागणी आहे. टाटा व्हिस्टा, बोल्ट या गाड्यांनाही चांगली मागणी होती. मोटारसायकल बाजारात हीरो, होंडा, टीव्हीएस या कंपन्यांच्या गाड्यांना विशेष मागणी दिसून आली. याव्यतिरिक्त कंपन्यांच्याही मोटारसायकलींची विक्री झाली. एकूणच दिवसभरात उलाढालीचा आकडा सुमारे तीस कोटींवर गेला.

शेतकरी ग्राहक अाहे
^पाडव्याचा मुहूर्त असतानाही दुष्काळी परिस्थितीमुळे अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मागील वर्षीच्या तुलनेत पंचवीस टक्क्यांनी विक्रीत घट झाली. दिवसभरात १७५ मोटारसायकलींची विक्री झाली. वास्तविक ही संख्या अडीचशेवर अपेक्षित होती.'' अप्पासाहेब होले, संचालक,शिवमटीव्हीएस.

रेनॉल्टची बुकिंग चांगली
^दुष्काळी परिस्थिती असली, तरी यापूर्वीच बुकिंग असल्याने ४० वाहनांची विक्री दिवसभरात झाली. कंपनीकडूनच वाहने उपलब्ध होत नसल्याने ३०० ग्राहक वेटिंगवर आहेत. क्विडमुळे मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली.'' संजयचक्रे, जनरलमनेजर,साईदीप कार्स.
बुकिंगमध्ये वाढ नाही
^वाहनखरेदीला चांगला प्रतिसाद आहे. दिवसभरात ७५ वाहनांची विक्री झाली. बुकिंगचा आकडा यापेक्षा मोठा आहे. परंतु कंपन्यांकडूनच वाहने उपलब्ध होत नसल्याने ग्राहक वेटिंगवर आहेत. स्विफ्ट डिझायरला मागणी वाढली.'' सत्यम कांकरिया, कांकरियाऑटोमाबाइल्स.