आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Painter Anuradha Thakur In Hundred Women Achievers

गरुड भरारी: 'हंड्रेड विमेन अचिव्हर्स'मध्ये चित्रकार अनुराधा ठाकूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आदिवासींची जीवनशैली, त्यांचे उत्सव चित्रबद्घ करून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नगरचा नावलौकिक वाढवणाऱ्या प्रसिद्ध चित्रकार अनुराधा ठाकूर यांचा समावेश 'हंड्रेड विमेन अचिव्हर्स'मध्ये झाला आहे. येत्या २२ जानेवारीला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या समवेत भोजनासाठी त्यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.

महिला बाल विकास मंत्रालयाच्या वतीने फेसबुकच्या सहकार्याने हा उपक्रम घेण्यात आला. या अंतर्गत विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांची निवड करून फेसबुकवरून त्यांना मते देण्याचे आवाहन करण्यात आले होते. "कला आणि संस्कृती' या गटातून चित्रकार अनुराधा ठाकूर यांची निवड झाली. नगर शहरासह देश-विदेशांतील रसिकांनी भरभरून त्यांना आपली मते दिली.
देशभरातून निवडलेल्या विविध क्षेत्रांतील या शंभर कर्तबगार महिलांचा गौरव २२ जानेवारीला दुपारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते केला जाणार आहे. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष भोजन समारंभाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी अनुराधा ठाकूर यांना महिला बाल विकास मंत्रालयाच्या वतीने निमंत्रण आले आहे. या मंत्रालयाच्या संयुक्त सचिव वंदना गुप्ता यांनी पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन केले आहे.
देशाच्या विविध प्रांतात फिरून तेथील आदिवासी जीवनाचा अभ्यास करून त्यांचे सण, उत्सव, विवाह समारंभ, पोषाख, अलंकार हे सगळं अनुराधा ठाकूर यांनी आपल्या वेगळ्या शैलीत रेखाटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पीएमओ ऑफिससह देश-विदेशांत अनेक ठिकाणी त्यांनी काढलेली चित्रं विराजमान झाली आहेत. "अनुभूतीच्या स्पंदनरेखा' हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध असून त्याला पाच राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. या पुस्तकाचा इंग्रजीतही अनुवाद झाला आहे.
देश-विदेशांत २२ सोलो एक्झिबिशन्स
चित्रकारअनुराधा ठाकूर यांची आतापर्यंत २२ सोलो एक्झिबिशन्स २३ ग्रूप एक्झिबिशन्स झाली आहेत. पॅरिस, बोस्टन, शिकागो, सोफिआ (बल्गेरिया), नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद येथे झालेली त्यांच्या चित्रांची प्रदर्शने विशेष गाजली. ठाकूर यांना गुजरातचे सीव्हीएम नॅशनल अवाॅर्ड, पंजाब आर्ट कौन्सिल वुई ग्रूप अवाॅर्ड. चंदिगड नॅशनल अवाॅर्ड, तसेच लोकमान्य टिळक अवाॅर्ड मिळाले आहे.