आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुदत संपूनही पडकई विकास योजनेची अनेक कामे अपूर्ण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - केंद्रीय विशेष अर्थसाहाय्यातून कृषी विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या पडकई विकास योजनेतील सावळागोंधळ संपायला तयार नाही. बेकायदेशीरपणे त्रयस्थ संस्थेला काम देऊन आगाऊ रक्कम देण्यात तत्परता दाखवणारा कृषी विभाग कामाच्या प्रगतीबाबत मात्र अनभिज्ञ आहे. अटी, शर्तीनुसार तीन महिन्यांत काम पूर्ण करणे बंधनकारक असताना बहुतांश कामे अपूर्णच आहेत. कृषी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राम शिंदे यांच्या नगर जिल्ह्यातच कृषी विभागाचा हा सावळागोंधळ सुरू आहे.

दैनिक दिव्य मराठीने गेल्या आठवड्यात पडकई योजनेत झालेला गैरव्यवहार उघडकीस आणला. आदिवासींच्या वनपट्ट्यांच्या जमिनीचे सपाटीकरण करून त्यांच्या जमिनी लागवडीखाली आणणे, तसेच आदिवासींना रोजगार देण्याचा पडकई योजनेचा मूळ उद्देश अाहे. सरकारी आदेशाप्रमाणे पडकईची कामे त्रयस्थ संस्थेला देता येत नाहीत. या योजनेच्या कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम देता येत नसल्याचे आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. मात्र, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी सरकारचे आदेश धाब्यावर बसवून पडकईची कामे जळगावच्या सर्वोदय या त्रयस्थ संस्थेला बहाल केली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने सर्वोदय संस्थेला २६ मार्चला कार्यारंभ आदेश दिला. संस्थेच्या मागणी अवघ्या पाच दिवसांत काेटी २४ लाख खर्चाचे काम बहाल करण्यात आले. त्यानंतरच्या अवघ्या दहा दिवसांत काम सुरू करण्यापूर्वीच कोटी २९ लाख ६० हजार रुपये सर्वोदय संस्थेच्या खात्यावर वर्ग करण्याची तत्परता बऱ्हाटे यांनी दाखवली.

बऱ्हाटे यांनी संबंधित संस्थेला काम देताना आगाऊ रक्कम अदा करताना दाखवलेली तत्परता कामाच्या प्रगतीबाबत घेण्यात आली नाही. बऱ्हाटे संबंधित संस्थेत ठरलेल्या करारानुसार कार्यारंभ आदेश दिल्यानंतर तीन महिन्यांत काम पूर्ण करणे बंधनकारक आहे. मात्र, कार्यारंभ आदेश देऊन साडेतीन महिने होत आले, तरीही कामे पूर्ण झालेली नाहीत. कार्यारंभ आदेश आगाऊ रक्कम देणारे बऱ्हाटे आता या संस्थेच्या विरोधात कारवाई करतात का, याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे. याप्रश्नी कृषिराज्यमंत्री शिंदे लक्ष देणार का, असाही सवाल उपस्थित होत आहे.

पावसामुळे कामात अडथळे
पडकईच्या कामांबाबत लाभार्थींच्या तक्रारी अाहेत. तथापि, अंदाजपत्रकानुसार बहुतांश कामे प्रगतिपथावर आहेत. कृषी सहायकांकडून झालेल्या कामांची तपासणी करण्यात येईल. अकोले तालुक्यात पाऊस सुरू असल्याने कामांत अडथळे येत आहेत. एम.के. हासे, तालुका कृषी अधिकारी, अकोले.
बातम्या आणखी आहेत...