आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Palak Mantri Ram Shinde Visit Nagar City On Tuesday

सर्वांना एकत्र घेऊन विकास करण्याचा मंत्री शिंदेंचा संकल्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पालकमंत्री राम शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त सहकार सभागृहातील व्यासपीठावर सर्वपक्षीय नेते गुरुवारी एकत्र आले होते. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चिला जाणारा जिल्हा विभाजनाचा सूर यावेळी सर्वपक्षीयांनी आळवला, पण मुख्यालयाविषयी एकमत झाल्याचे दिसले नाही. मंत्री शिंदे यांनी सर्वांच्या भावनांचा विचार करूनच जिल्हा विभाजनाचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.

मंत्री शिंदे यांचा सर्वपक्षीय सत्कार समारंभ दुपारी एक वाजता होता. तथापि, मंत्रीच साडेतीन वाजता कार्यक्रमस्थळी पोहोचले. आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. खासदार दिलीप गांधी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड, आमदार शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, मोनिका राजळे, स्नेहलता कोल्हे, भाऊसाहेब कांबळे, माजी पालकमंत्री बबनराव पाचपुते, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, भानुदास बेरड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे व रावसाहेब खेवरे यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना ससाणे, अभंग, कर्डिले, पाचपुते, गांधी, कांबळे, पवार आदींनी जिल्हा विभाजनाच्या मुद्द्यावर बोट ठेवून तातडीने जिल्हा विभाजन करावे, असा सूर आळवला.
मंत्री शिंदे म्हणाले, नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्व पक्षीयांना एकत्र आणून माझ्यावर सोपवलेल्या जबाबदारीच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा मी संकल्प केला आहे. जिल्हा विभाजनाच्या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याशी मी चर्चा करेन.
दिवसेंदिवस सिंचनाचे क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीऐवजी ठिबक पद्धतीने शेती करण्याची गरज आहे. आपल्या हक्काचे पाणी आपल्यालाच मिळायला हवे यासाठी प्रयत्न केला जाईल. घाटमाथ्यावरचे पाणी वळवण्यासाठी सुमारे १५ हजार कोटींची तरतूद आहे. त्यात आपल्या जिल्ह्याला स्थान कसे मिळवता येईल, यासाठी मी पाठपुरावा करेन. जिल्ह्यात विमानासाठी धावपट्टी असायला हवी, दौंड-शिर्डी-मनमाड रेल्वेमार्ग दुहेरी करायचा आहे.
कायदा व सुव्यवस्थेसाठी जिल्ह्यात पाच नवीन पोलिस ठाणी निर्माण केली जातील, असे त्यांनी सांगितले.

कर्डिले म्हणाले, विकासात अन्याय होऊ नये, म्हणून जिल्हा विभाजनाचा निर्णय व्हायला हवा. त्यावेळी कृषिमंत्र्यांना राहाता जिल्हा व्हावा, असे वाटत होते. पण तसा निर्णय झाला नाही. गांधी म्हणाले, आम्ही एकमेेकांना चिमटे काढत असलो, तरी विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सर्वजण एक आहोत.

विभाजनाबाबत काय म्हणाले नेते...
^ नगर जिल्ह्याचे विभाजन करायला हवे. विभाजन करताना उत्तरेचे मुख्यालय श्रीरामपूरच करा.''
जयंत ससाणे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.
^ उत्तरेकडून दक्षिणेवर अन्याय झाला आहे. त्यामुळे जिल्हा विभाजनाचा निर्णय तातडीने घ्यायला हवा.'' शिवाजी कर्डिले, आमदार.
^ आतापर्यंत राज्यातील सात जिल्ह्यांचे विभाजन झाले. आता आपला नंबर आहे. कोणतेही मुख्यालय करा, पण विभाजन करा.''
बबनराव पाचपुते, माजी पालकमंत्री.
^ जिल्हा विभाजनासाठी सर्वपक्षीय मानसिकता झाली आहे. पण हे करत असताना सर्वांना बरोबर घेण्याची कसरतही करावी लागणार आहे.
दिलीप गांधी, खासदार.
^प्रशासकीय गरज म्हणून जिल्ह्याचे विभाजन करायला हवे. नव्या जिल्ह्याचे मुख्यालय राहाता, संगमनेर, श्रीरामपूर कोणतेही करा. गरज वाटली, तर जसे नागपूर हंगामी आहे, तसे हंगामी मुख्यालय करा, पण विभाजन करा.'' पोपटराव पवार, सामाजिक कार्यकर्ते, हिवरेबाजार.

जयंत ससाणे यांची कोपरखळी
मला आताच कोणी, तरी सांगितले की, तुमच्या मंत्र्यांचे अनुभव सांगा. पण आमच्या मंत्र्यांचे अनुभव होते म्हणूनच तुम्हाला संधी मिळाली. नाही तर आम्हालाच पुन्हा तुमचे अनुभव सांगण्याची वेळ येऊ नये, अशी कोपरखळी जयंत ससाणे यांनी भाजपच्या नेत्यांना मारली.