आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्यानबा-तुकारामाच्या गजराने दुमदुमले नगर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीला निघालेल्या दिंड्यांनी नगर शहर भक्तिरसमय झाले आहे. टाळ-मृदंगाच्या निनादात ‘ग्यानबा-तुकाराम’च्या जयघोषाने वातावरण भारून गेले आहे. शहरात ठिकठिकाणी दिंड्यांचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे.

‘चालली दिंडी पंढरीला..पंढरीला हो पंढरीला..’ वारी शब्दाचा अर्थ ‘येरझार’ असा आहे. पंढरपूरच्या वारीसाठी घरापासूनच पायी चालत पांडुरंगाच्या भेटीला जाणे ही शेकडो वर्षांपूर्वी सुरू झालेली परंपरा आजही कायम आहे. महाराष्ट्राच्या उत्तर भागातील बहुतेक दिंड्या नगरमार्गे पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात. शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जाणार्‍या देवगड येथील दिंडीचे 7 जुलैला येथे आगमन झाले. या दिंडीत सुमारे 1500 वारकरी सहभागी झाले आहेत. संत महिपती महाराजांच्या दिंडीचेही रविवारी आगमन झाले. मुक्काम केल्यानंतर सोमवारी या दिंड्या पंढरपूरकडे निघाल्या. सकाळपासून नगर-औरंगाबाद रस्त्यावरून विविध दिंड्या जाताना दिसत होत्या.

खांद्यावर भगवे झेंडे, गळ्यात टाळ अन् मुखाने ग्यानबा-तुकोबाचा जयघोष करीत दिंड्या जात आहेत. संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, नाशिक, नगर, धुळे, औरंगाबाद आदी भागांतून निघालेल्या दिंड्यांचाही त्यात समावेश आहे. मनमाड महामार्गावरून आलेल्या दिंड्या पत्रकार चौकातून डीएसपी चौकमार्गे पुढे जातात. श्रीरामपूर तालुक्यातील सराला बेट येथील सद्गुरू गंगागिरी महाराजांची दिंडी दुपारी तीनच्या सुमारास शहरात दाखल झाली. या दिंडीत सुमारे अडीच हजार वारकरी सहभागी झाले आहेत. या दिंडीचे सावेडी येथे नानासाहेब बारस्कर यांच्या निवासस्थानी आगमन झाल्यानंतर तेथे रिंगण सोहळा झाला. वारकर्‍यांसाठी विविध ठिकाणी प्रसाद, चहापाणी तसेच फळांचे वाटप करण्यात आले. नगर तालुक्यातील काही दिंड्या मंगळवारी शहरात दाखल होतील.