आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पळशी अत्याचारप्रकरणी १५ दिवसांत दोषारोपपत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर - पळशी येथील सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध पंधरा दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याचे अाश्वासन उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद भोईटे यांनी सोमवारी दिले. घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने टाकळी ढोकेश्वर येथे मूकमोर्चा काढून नगर-कल्याण महामार्गावर वासुंदे चौक येथे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पीडित मुलीसह तिचे आई, वडील, आजोबा, बहीण भाऊ सहभागी झाले होते.
सकाळी साडेदहा वाजता टाकळी ढोकेश्वर वेशीपासून मूक मोर्चाला सुरुवात झाली. भगवे ध्वज घटनेच्या निषेधाचे फलक आंदोलकांच्या हातात होते. जि. प. सदस्य सुजित झावरे, आझाद ठुबे, संजीव भोर, राहुल शिंदे, डॉ. भाऊसाहेब खिलारी आदींसह मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. पळशी येथील विद्यार्थिनीने महिलांच्या व्यथा मांडल्या. कोपर्डीतील घटनेच्या निषेधार्थ राज्यात लाखोंचे मोर्चे निघत असताना नराधमांची असे कृत्य करण्याची हिंमत होतेच कशी, असा सवाल तिने उपस्थित केला. महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना न्यायालयात शिक्षा मिळण्याची वाट पहात बसण्यापेक्षा जिजाऊ अहिल्येच्या लेकींच्या हवाली करा, त्यांचा कडेलोट केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशा संतप्त भावना तिने व्यक्त केल्या. आता संयमाचे नव्हे, तर संतापाचे मोर्चे काढावे लागतील, असा इशाराही तिने दिला. शासनाला ही अराजकता समजत का नाही, असा सवाल तिने उपस्थित केला.

पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे गुन्हेगार निर्ढावले असून त्यामुळेच असे गुन्हे करण्याची हिंमत वाढत असल्याचे मत भोर यांनी व्यक्त केले. पंधरा दिवसांतच दोषारोपपत्र दाखल करावे, अशी मागणी त्यांनी केली. पंच साक्षीदार म्हणून प्रशासनाला मदत करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहनही भोर यांनी केले. कोपर्डी पळशी येथील गुन्ह्यांबाबत दाखल केले जाणारे दोषारोपपत्र तज्ज्ञांकडून तपासून घेतले जाईल. त्यामध्ये त्रुटी राहू नये, आरोपींना त्याचा फायदा होऊ नये, याबाबत काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आमचा लढा प्रवृत्तीविरुद्ध असून कोणत्याही समाजाविरोधात नाही, असे झावरे म्हणाले. महिलांवरील अत्याचाराच्या घटना दारुच्या नशेतच घडत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांनी अवैध दारुअड्ड्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. अनेक गावांत दारुबंदीचे ठराव झाले आहेत, तरीही अवैध दारुविक्री सुरू असून पोलिसांनी दखल घेतल्यास तरुणांना सोबत घेऊन आम्हीच दारुअड्डे उद््ध्वस्त करू, असा इशाराही झावरे यांनी यावेळी दिला. पळशी प्रकरणाचे दोषारोपपत्र पंधरा दिवसांत दाखल करावे, हा खटला जलदगतीने चालावा, अशी मागणीही त्यांनी केली.

विशेष वकिलांची नियुक्ती करणार
पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे यांनी त्वरित तपास करण्याचे, तसेच दोषारोपपत्र १५ दिवसांत दाखल करण्याचे आश्वासन दिले. बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा असल्याने सहा महिन्यांत निकाल लागेल, असे ते म्हणाले. विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून गृहमंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासनही दिले.

बातम्या आणखी आहेत...