आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर पंचायत समितीच्या मासिक सभेत पुन्हा वाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर पंचायत समितीतील सभापती विरुद्ध सदस्य यांच्यातील वाद अजूनही संपुष्टात आलेला नाही. कोरमअभावी तहकूब सभेच्या बुधवारी (4 डिसेंबर) झालेल्या फेरसभेतही त्याचे पडसाद उमटले. पंचायत समिती सदस्यांची दुकानदारी या मुद्द्यावर शिवसेना सदस्य आश्विनी जाधव यांनी सभापती सुनीता नेटके यांना जाब विचारला. जाधव यांच्या प्रश्नावर सर्वच सदस्यांनी पाठिंबा देत सभापतींना धारेवर धरले. विशेषत: या सभेत सर्वच महिला सदस्य आक्रमक होत्या.

ऑक्टोबर महिन्यातील सभेत सदस्य जयश्री दरंदले यांना पाणी प्रश्नावरील चर्चेत सहभागी होण्यास सभापती नेटके यांनी हरकत घेतली होती. तसेच उपसभापती शरद झोडगे यांना सभापतींनी वापरलेले अपशब्द यावर सर्वच सदस्यांनी सभात्याग केला होता. वाद विकोपाला गेल्याने 25 नोव्हेंबरच्या मासिक सभेवर सर्वच सदस्यांनी बहिष्कार टाकल्याने कोरमअभावी सभा तहकूब करावी लागली होती. यावेळी सभापती नेटके यांनी आपण सदस्यांची पंचायत समितीतील दुकानदारी बंद केली असल्याचा राग सदस्यांना आहे. सर्वच सदस्यांच्या बोगसकामांचा भांडाफोड करणार असून त्यांच्या कामांच्या दर्जाची तपासणी केली जाईल, असा इशारा नेटके यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी सभापतींसह सर्वच सदस्यांची कानउघडणी करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण समोपचाराच्या बैठकीनंतर नुकत्याच झालेल्या पंचायत समिती मासिक सभेत हा वाद पुन्हा उफाळून आला. ‘आम्ही कोणती दुकानदारी केली?’ असा जाब सदस्यांनी सभापतींना विचारला. हा वाद वाढत असल्याचे पाहून सदस्य संदेश कार्ले यांनी मध्यस्थी करत सभागृहाला शांत करत सभा आटोपती घेतली.

वादात रखडला 13 वा वित्त आयोग निधी
सदस्यांविरुद्ध सभापतींचा वाद एक वर्षापासून सुरू आहे. नवीन पंचायत समितीतील प्रवेशानंतर वाद चव्हाट्यावर आला. त्याचे पडसादही सभेत व सभागृहाबाहेर आले. पण या वादाचा फटका 13 व्या वित्त आयोगाच्या विकास निधीला बसला. विषयपत्रिकेवर असूनही सभागृहासमोर आला नाही. परिणामी पंचायत समिती स्तरावर आलेला निधी पडून राहिला आहे.

खुशाल तपासणी करा
जनतेचे प्रश्न आम्ही मांडणारच. कोणत्या सदस्यांची दुकानदारी सुरू आहे? हे सभापतींनी नावासह सांगावे. आम्ही केलेल्या विकासकामांच्या दर्जाची कोणीही आणि कधीही खुशाल तपासणी करावी.’’ अश्विनी जाधव, सदस्य.