आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्धापन दिन: दोन हजारांवर रसिकांनी अनुभवली पं.शिवकुमार यांची मैफल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- इंद्राच्या दरबारालाही लाजवेल, अशी बहारदार मैफल आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा व तबलावादक योगेश समसी यांच्या स्वरझंकारातून शनिवारी रात्री साकारली. या भावसमाधीचा आनंद दोन हजारांहून अधिक रसिकांनी अनुभवला. पंडित शिवकुमारजींची नगरमधील ही पहिलीच मैफल ऐतिहासिक ठरली.
दैनिक "दिव्य मराठी'च्या नगर आवृत्तीच्या तिसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून "दिव्य मराठी' व पुण्यातील व्हायोलिन अकॅडमीच्या वतीने नंदनवन लॉन्सवर स्वरझंकार मैफल आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स, तर सहप्रायोजक बँक ऑफ इंडिया, सिस्का एलईडी, बँक ऑफ महाराष्ट्र आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया होते. फुलांनी सजवलेले व्यासपीठ, सरस्वतीची शुभ्र मूर्ती, तेवणारी समयी अशा प्रसन्न वातावरणात सुरू झालेल्या या मैफलीला संगीत क्षेत्रातील जाणकारांसह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते. गुलाबी रंगाचा नक्षीदार रेशमी कुर्ता परिधान केलेले, निसर्गदत्त काश्मिरी सौंदर्य लाभलेले पंडित शिवकुमारजींचे व्यासपीठावर आगमन होताच सर्व रसिकांनी उभं राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. पंडितजींनीही दोन्ही हात जोडून नगरकरांच्या अभिवादनाचा विनम्र स्वीकार केला.
संतूरच्या शततारा झंकारत या बहारदार मैफलीला प्रारंभ झाला. तबल्यावर साथीला होते योगेश समसी, तर तानपुऱ्यावर होते दीपक काळे. पूर्वार्धात पंडित शिवकुमारजींनी राग पुरिया सादर केला. सायंकाळी संधिप्रकाशात वाजवला जाणारा हा राग ऐकताना रसिकांना भावसमाधी लागली. मत्तताल विलंबित ९ मात्रा आणि एकताल द्रूत 12 मात्रा हे या रागाचे वैशिष्ठ्य. सुरूवात आलापीने करून पुरिया कल्याण रागाचा आकृतिबंध, प्रतिमा, स्वरूप व मूर्ती पंडितजींनी नगरकर रसिकांसमोर साकार केली. मैफलीच्या उत्तरार्धात पंडितजींनी मिश्र खमाज राग सादर केला. याच्या सादरीकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे पंडितजींनी त्यात ठुमरी, दादरा, कजरी व तीर अनेक रागांचा समावेश करून एक प्रकारे शास्त्रीय संगीतातील 'फ्यूजन' सादर केले. पंडितजींनी प्रथम मिश्र खमाज रागात आधारभूत गत घेतली. (गायनातील "आयो कहांसे घनशाम...' ही ठुमरी) त्याला दादरा तालातील (6 मात्रा) ठेका घेऊन पंडित योगेश यांनी तबलावादनाचा देखणा आविष्कार सादर केला. त्यांच्या तबलावादनाचे पंडितजींनीही कौतुक केले. विरह, खोडी, गाऱ्हाणे, आळवणी, भक्तिभाव असे वेगवेगळे भाव आणि तिलक कामोद, केदार, वसंत, मालकंस, मारवा, हमीर, भैरव अशा विविध रागांचे अनोखे मिश्रण ऐकताना श्रोत्यांमधून टाळ्यांचा कडकडाट होत होता. जाणकारांकडून विशेष दाद मिळत होती. मैफलीच्या शेवटी जी चक्रधर बेदम तिहाई घेतली, ती अफलातून "अफाट तिहाई' अशीच होती.
सव्वा दोन तास चाललेल्या या मैफलीत रसिकांना अक्षरश भावसमाधी लागली होती. पंडितजींनी संतूरवादन थांबवूच नये, असे प्रत्येकाला वाटत होते. शास्त्रीय संगीताची फारशी जाण नसलेल्या मंडळींनाही ही मैफल ऐकून भरून पावल्याचा आनंद झाला. मैफल संपल्यानंतर घरी जातानाही संतूरचे सूर मनात रुंजी घालत होते...
प्रारंभी व्हायोलिन अकादमीचे पंडित अतुलकुमार उपाध्ये यांनी संस्थेची माहिती दिली. प्रायोजकांच्या वतीने सूरज सोनार, शशांक बरिदे, एम. जी. महाबळेश्वरकर, उल्हास देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. "दिव्य मराठी'च्या वतीने ब्युरो चिफ मिलिंद बेंडाळे यांनी पंडितजींचे, तर जाहिरात व्यवस्थापक नीलेश सोनवणे व वितरण व्यवस्थापक प्रमोद गायकवाड यांनी पंडित योगेश समसी व दिलीप काळे यांचे गणेशमूर्ती भेट देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले.
नगरकरांच्या स्वागत व प्रतिसादाने पंडितजी भारावले
आयरिस हॉटेलवर पंडितजींचे आगमन होताच नगरच्या संगीत रसिकांच्या वतीने विश्वास जाधव, ज्ञानेश्वर दुधाडे, राम शिंदे, सुहास मुळे, सुनील चिटणीस यांनी त्यांचे स्वागत केले. मैफलीत मिळणारा प्रतिसादही पंडितजींना सुखावून गेला. त्यांनी याचा जाहीर उल्लेखही केला. पंडित रघुनाथ केसकर, प्रसिद्ध ब्रह्मवीणा वादक मधुकर चौधरी, गायक पवन नाईक, ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद मिरीकर, मकरंद खेर, स्मिता राणा, प्रदीप गांधी, जयंत आयचित्ते, श्रीकृष्ण केंगे यांनी ही मैफल अविस्मरणीय झाल्याचे आवर्जून नमूद केले.
नव्या पिढीत चांगले कानसेन तयार व्हावेत...
आम्हाला फक्त तानसेन नाही, तर चांगले कानसेन तयार करायचे आहे. त्यासाठी व्हायोलिन अकॅडमीच्या वतीने 35 सेंटरमध्ये अशा स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. ऑनलाइन अ‍ॅप्रिसिएशनसारखे उपक्रमही सुरू करण्यात आले आहेत, असे पंडित अतुलकुमार उपाध्ये यांनी सांगितले. मी मूळचा नगर जिल्ह्यातील कान्हूर पठारचा रहिवासी आहे. यापुढे 2-3 दिवसांचा मोठा महोत्सवही नगरमध्ये आयोजित करण्याचा मानस आहे, असे त्यांनी सांगताच श्रोत्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.