आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pandit Shivkumar Sharma Music Concerts News In Marathi

पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतूरवादनाची आज रंगणार मैफल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरमध्ये पहिल्यांदाच होत असलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतूरवादनाच्या मैफलीसाठी नगरचे रसिक उत्सुक झाले आहेत. शनिवारी (२० डिसेंबर) सायंकाळी साडेपाच वाजता नवीन टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉन्समध्ये ही स्वरझंकार मैफल सुरू होईल. दैनिक दिव्य मराठीच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमाच्या प्रवेशिकांना मोठी मागणी आहे.
पुण्यातील व्हायोलिन अकादमी "दिव्य मराठी'च्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या मैफलीत पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतूरवादनाचा अविस्मरणीय आनंद नगरच्या रसिकांना घेता येईल. या मैफलीच्या निमित्ताने पंडित शिवकुमारजी प्रथमच नगर शहरात येत आहेत. संतूर या वाद्याला साऱ्या विश्वात लोकप्रियता लोकमान्यता मिळवून देणाऱ्या पंडितजींच्या मैफली जगभरात झाल्या असून त्यांचा शिष्यवर्ग मोठा आहे. सहजसुंदर आलापी, रागातील सुरांच्या तालाशी सुरेख संवाद साधणारे त्यांचे वादन रसिकांना स्वर्गीय अनुभवत देते. भारत सरकारच्या पद्मविभूषण किताबासह अनेक पुरस्कारांनी पंडितजींना सन्मानित करण्यात आले आहे.
नगरमध्ये होणाऱ्या मैफलीत पंडित शिवकुमारजी यांना तबल्याची साथ पंडित योगेश समसी, तर तानपुऱ्याची साथ दिलीप काळे हे त्यांचे शिष्य करणार आहेत. या कार्यक्रमाची ध्वनिव्यवस्था पंडितजींचे जपानी शिष्य टाकाहीरो बघणार आहेत. कार्यक्रमाचे संयोजन व्हायोलिन अकादमीचे पंडित अतुलकुमार उपाध्ये (पुणे) यांचे आहे.
या कार्यक्रमासाठी प्रवेशिकांना मोठी मागणी आहे. प्रवेशिका मिळालेल्या रसिकांचीही व्यवस्था केली जाणार असल्याने नगरकरांनी मोठ्या संख्येने मैफलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन "दिव्य मराठी' व्हायोलिन अकादमीच्या वतीने करण्यात आले आहे.