आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांडुळे अन् भोगले वादावर लंघेंची फुं‍कर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- दलित वस्त्यांच्या कामावरून जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे व जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांच्यातील वादावर फुंकर घालण्यासाठी जि. प. अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी शनिवारी (३० ऑगस्ट) बैठक बोलवली आहे.
अधिकारी व पदाधिकारी ही ग्रामीण विकासाची दोन चाके असल्याचे मानले जाते. ग्रामीण विकासाची धुरा सांभाळत असताना लोकप्रतिनिधी व लोकसेवक यांच्यात विविध मुद्द्यांवरून मतभेद होतात. मंगळवारी (२६ ऑगस्ट) सदस्य पांडुळे व भोगले यांच्यातील वाद विकोपाला गेला. हा वाद पोलिस ठाण्यात जाण्यापूर्वी काही ज्येष्ठ सदस्यांनी तो मिटवण्याचा प्रयत्न केला. पण रात्री उशिरा कोतवाली पोलिस ठाण्यात भोगले यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुुन्हा पांडुळे यांच्यावर दाखल झाला. या प्रकारामुळे सदस्य व अधिकाऱ्यांमध्ये तणाव आणखी वाढला असून नेमकी चूक कुणाची यावर काथ्याकूट सुरू आहे.
गुरुवारी दुपारी अध्यक्ष लंघे यांनी सदस्य व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, घडलेला प्रकार चुकीचा आहे. नेमकी चूक कुणाची हे सांगता येणार नाही. मी कामकाजानिमित्त बाहेर होतो, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवालही उपस्थित नव्हते. पांडुळे आिण भोगले यांच्यात शािब्दक चकमक झाल्यानंतर सदस्य बाळासाहेब हराळ यांनी तातडीने भोगले यांची भेट घेतली. असे प्रकार घडू नयेत, यासाठी चर्चा करून प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. विकासकामांबाबत अधिकाऱ्यांनी भूिमका मांडल्यानंतर सदस्यांनी आक्रमक होऊ नये, तसेच सदस्यानेही एखादा प्रश्न मांडल्यास अधिकाऱ्यांनीही तीव्र प्रतिक्रिया न देता चर्चेतून मार्ग काढायला हवा. यासंदर्भात मी सर्वांशी चर्चा केली आहे. भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी अधिकारी व पदाधिकारी, सदस्यांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. विसंवादाची दरी कमी करण्यासाठी माझा प्रयत्न असून शनिवारी यासंदर्भात बैठक घेण्यात येईल.
अधिकाऱ्यांकडून समाधान न झाल्यास सदस्यांनी पदाधिकारी या नात्याने माझ्याशी चर्चा करावी, जेणेकरून संवादाने प्रश्न सोडवता येतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी सभापती कैलास वाकचौरे, सदस्य बाळासाहेब हराळ, बाजीराव गवारे, सुनील गडाख उपस्थित होते. या प्रकाराचा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी निषेध केला असला, तरी पांडुळे यांना पाठिंबा देण्यासाठी काही संघटना पुढाकार घेणार आहेत. त्यामुळे हा वाद आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे.
अधिकाऱ्यांवर कारवाई करा
शासकीय कर्मचाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे दलित वस्ती सुधारणांची कामे होत नसल्याने निधी परत जातो. याप्रकरणी लोकप्रतिनिधींनी विचारणा केली, तर त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले जातात. या प्रकाराचा मिरजगाव जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायतीच्या सर्व सरपंच, उपसरपंचांनी निषेध केला. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सरपंच व उपसरपंचांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भोगले यांच्या आडमुठ्या धोरणामुळे गेल्या दोन वर्षांपासून दलित वस्ती सुधार योजनेचा निधी पडून आहे. हा निधी परत जाऊ नये, यासाठी पांडुळे यांनी विचारणा केली असता त्यांच्यावरच कारवाई होत असेल, तर हा दलितांवरील अन्याय आहे. अशा अधिकाऱ्यावर कारवाई करावी, असे पत्रकात म्हटले आहे.
जि. प. सदस्य पांडुळे यांची भूमिका योग्य आहे. जेथे दलितांच्या विकासाला विरोध होतो, तेथे दलित बांधव अन्यायाविरोधात पेटून उठतो आिण आंदोलन करतो. शासनानेच जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना रोखावे; अन्यथा दलितांवरील अन्यायाविरोधात दलित जनता रस्त्यावर येईल, असा इशारा समता आंदोलनाचे तालुकाध्यक्ष अंकुश भैलुमे व कुलदीप गंगावणे यांनी दिला आहे.
दरम्यान, यासंदर्भात गुरुवारी झालेल्या बैठकीस मिरजगाव येथील सरपंच सारंग घोडेस्वार, मांदळीचे सरपंच बबनराव बचाटे, सुधाजी गायकवाड, अविनाश चव्हाण, बापूराव साळवे, कल्याण जगधने, सुभाष लोंढे, गौतम सकट, गणेश मांढरे, दत्तात्रय शेलार, गणेश जोगदंड, महावीर अडागळे आदी उपस्थित होते.
चौकशी करण्याची मागणी
अधिकारी भोगले यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी चाैकशी करून कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब व कर्मचारी महासंघाच्या वतीने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप यांच्याकडे करण्यात आली. या प्रकरणाची वेळीच दखल घेऊन कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष गुणवंत खुरंगळे, हर्षवर्धन सोनवणे, बाळासाहेब धनवे, शिवाजी शिंदे, बाळासाहेब पातारे, किशोर उजागरे आदी उपस्थित होते.