आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलितवस्ती प्रकरण: समाजकल्याण अधिकारी भोगलेंना धमकी प्रकरणी पांडुळेंविरुद्ध गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दलितवस्ती सुधार योजनेतील कामांची निवड पैसे घेऊन केल्याचा आरोप करून जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे यांनी जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांना धमकावल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल झाला.
मंगळवारी दुपारी ही घटना घडली. विचारलेली माहिती दिल्यानंतरही पांडुळे यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार भोगले यांनी केली. याप्रकरणी पांडुळे यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
समाजकल्याण विभागाला २०१४-२०१५ या वर्षासाठी सुमारे ४५ कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. पैकी १५ कोटींच्या विकासकामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. यासंदर्भात २५ जुलैला झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी १५ कोटींच्या कामांची मंजुरी नियम डावलून दिल्याचा आरोप केला. त्यामुळे अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी या कामांना स्थगिती देऊन या विषयावर स्वतंत्र बैठक घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत १५ कोटींच्या कामांची मंजुरी रद्द करून एकत्रित ४५ कोटींच्या कामांना सदस्यांच्या शिफारशीनुसार मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार समाजकल्याण विभागात कामांची यादी निश्चित करण्याचे काम सुरू आहे. मात्र, वस्त्यांच्या निवडीवरून अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात शीतयुद्ध सुरू अाहे. मंगळवारी दुपारी सव्वादोन वाजता भोगले त्यांच्या दालनात गटविकास अधिकारी भूपेंद्र बोडसे, परीक्षित यादव व किरण महाजन यांच्याशी दलितवस्ती सुधार योजनेबाबत चर्चा करत होते. त्यावेळी पांडुळे यांनी दालनात बळजबरीने प्रवेश केला. ‘दलितवस्ती सुधार कामाची निवड पैसे घेऊन केली', असा आरोप करत त्यांनी भोगले यांना शिवीगाळ केली, तसेच ‘तू खाली ये, तुझ्याकडे पाहतो', अशी धमकी दिली. भोगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे, दालनात जबरदस्तीने प्रवेश करणे, धमकावणे या कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्याचा तपास कोतवाली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक व्ही. एल. सणस करत आहेत. याप्रकरणी जिल्हा परिषद अध्यक्ष काय भूिमका मांडणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.
समन्वय बैठकीचे काय झाले?
जिल्हा परिषदेत अधिकारी व पदाधिकारी यांच्यात समन्वय ठेवण्यासाठी दर सोमवारी समन्वय बैठक घेण्याचे यापूर्वी ठरले होते. तथापि, पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनाही या बैठकीचा विसर पडला आहे. महिनाभरात एखाद्या सोमवारी ही बैठक होते. बऱ्याचदा पदाधिकाऱ्यांच्या सवडीनुसारच या बैठकीला मुहूर्त लागतो. त्यामुळे अधिकारी व पदाधिकारी यांच्यात विसंवाद असून असे वाद भविष्यात उद्भवण्याची शक्यता आहे.
राज्यभर आंदोलन
जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले हे नियमानुसार काम करणारे अधिकारी असून ते कोणत्याही लोकप्रतिनिधीचे कधीही लांगूलचालन करत नाहीत. आपल्या मनाप्रमाणे काम झाले नाही, म्हणून चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्याला धमकावणे हे कोणत्याही लोकप्रतिनिधीला शोभत नाही. अशामुळे चांगल्या अधिकाऱ्याला काम करणे अवघड झाले आहे. राज्यभरातून या घटनेचा निषेध झाला आहे. गुरुवारी (२८ आॅगस्ट) दुपारपासून आम्ही राज्यभर निदर्शने करणार आहोत. यासंदर्भात सामाजिक न्याय मंत्र्यांशीही चर्चा झाली आहे.” राजेंद्र कलाल, उपाध्यक्ष, राज्य राजपत्रित समाजकल्याण अधिकारी संघटना.
संघटनांची निदर्शने
प्रदीप भोगले यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने बुधवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या आवारात निदर्शने करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून घटनेचा निषेध केला. पांडुळे यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विजय कोरडे, शशिकांत रासकर, अशोक काळापहाड, रवी भिंगारदिवे, राजू जरे, शिवाजी शिंदे, राजेंद्र थोरात, सुहास गोबरे आदी उपस्थित होते. अधिकारी व लोकप्रतिनिधींमधील वाद चांगलाच चिघळला असून राज्यभरातील अधिकाऱ्यांकडून या घटनेविषयी निषेध व्यक्त होत आहे.