आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा बैठक: 'भगवानगडावर राजकारण नाही', पंकजा मुंडे यांचे स्पष्टीकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खासदार दिलीप गांधी यांच्या नवीन संपर्क कार्यालयाला मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली. यावेळी खासदार गांधी, सुवेंद्र गांधी उपस्थित होते. - Divya Marathi
खासदार दिलीप गांधी यांच्या नवीन संपर्क कार्यालयाला मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली. यावेळी खासदार गांधी, सुवेंद्र गांधी उपस्थित होते.
नगर- भगवानगडावरून मी कधीच राजकारण केले नाही. राजकीय चर्चादेखील गडावरून केली नाही आणि यापुढेही करणार नाही, असे स्पष्टीकरण महिला बालविकास ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी दिले. भगवानगडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री हे आमचे श्रध्दास्थान आहे. गड हा सर्व समाजाचा आहे. मी गडाची एक भाविक आहे, असेही त्यांनी सांगितले.

खासदार दिलीप गांधी यांच्या नवीन संपर्क कार्यालयाला मुंडे यांनी भेट दिली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. खासदार गांधी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुवेंद्र गांधी, श्रीपाद छिंदम, नवनीत सुरपुरिया, अजय बोरा, मनेष साठे, चेतन जग्गी, पीयूष जग्गी, मुकुंद गर्जे, प्रशांत मुथ्था आदी यावेळी उपस्थित होते.
भगवानगडावरून मी राजकीय चर्चा करणार नाही. दसऱ्या मेळाव्याचा कुठला वादच नाही. त्यामुळे त्यावर मी काय भाष्य करू, असे सांगून मुंडे म्हणाल्या, भगवानगडाचे नामदेवशास्त्री हे आमच्यासाठी श्रध्दास्थान आहे. गड या सर्व समाजाचा आहे. मी गडाची एक भाविक आहे.
मुंडे म्हणाल्या, मुख्यमंत्री सडक योजना राज्याची आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र तांत्रिक अधिकारी, सचिव नियुक्त करण्याचा विचार आहे. या याेजनेवर राज्य सरकारचा अंकुश राहणार असून, पंतप्रधान ग्रामसडक योजनेचेच निकष या योजनेला लावण्यात आले आहेत. रस्त्याच्या दर्जाबाबत तडजोड केली जाणार नाही. राज्यात या योजनेतून ३० हजार किलोमीटरचे रस्ते करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात हजार किलोमीटरचे रस्ते करण्यात येतील. त्यासाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मार्चअखेरपर्यंत हजार किलोमीटरचे रस्ते करण्यात येणार असून, या याेजनेसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक समिती स्थापन करण्यात आली अाहे. या समितीत पालकमंत्री दोन आमदार अाहेत. नगर जिल्ह्यात मुख्यमंत्री सडक योजनेतून ७२ किलोमीटरचे रस्ते झाले आहेत. उर्वरित रस्त्यांच्या कामासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून मजुरांना शंभर दिवसांऐवजी दीडशे दिवस रोजगार उपलब्ध करून देण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत मजुरांना कामे मिळावीत, हा उद्देश यशस्वी होणार आहे. दुष्काळ पडल्यानंतर सरकारकडून शेतकऱ्यांना पॅकेज दिले जाते.
पॅकेजऐवजी शेतकरी कर्जबाजारी होऊ नये, यासाठी शेतीवर आधारित पूरक उद्योगांना चालना देणे आवश्यक आहे. भाजप सरकाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्राधान्याने मदत दिली आहे. ब्रिटिशकालीन आणेवारी बदलण्याबाबत सरकारकडून विचार सुरू आहे, असे मुंडे म्हणाल्या.
नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मुंडे यांनी जलयुक्त शिवार अभियानासह विविध योजनांची आढावा बैठक घेतली. बैठकीस खासदार गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, उपवनसंरक्षक जी. डी. वळसे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय बोरुडे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक वसंत गारूडकर, नगरसेवक सुवेंद्र गांधी आदी यावेळी उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मुंडे म्हणाल्या, जलयुक्त शिवार अभियान अभियानामुळे महाराष्ट्र निश्चितपणे दुष्काळमुक्त होईल. जलयुक्त शिवार अभियानाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. योजनेची गतिमानता वाढवण्या साठी प्रयत्न होणे अावश्यक आहे. जलयुक्त अभियान राज्यात प्रभावीपणे राबवल्याने दुसऱ्या राज्यांनी या योजनेचे अनुकरण करणे सुरू केले आहे. लवकरच मुख्यमंत्री फडणवीस राजस्थानात जाऊन या योजनेचा प्रारंभ करणार आहेत. सरकारने सुरू केलेल्या योजना जनतेपुढे गेल्या पाहिजेत. जगालाही योजनांची माहिती कळली पाहिजे. या योजनेत फसवणूक करता येणार नसल्यामुळे योजनेचा पारदर्शकपणा वाढणार आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून गेल्या वर्षी १४०० कोटींच्या निधीतून हजार गावांत ३० हजार जलसंधारणाची कामे झाली आहेत. त्यातून २४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यापूर्वी राज्यात एक टक्काही सिंचन झाले नाही. जलयुक्तला राज्यात प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा परिषदेचेही रोल ऑडिट झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
पुढे वाचा, स्वागतार्ह नियुक्ती..., आठवड्यातून किमान एकदा "फिल्ड'वर जावे...