आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pankaja Munde Rally At Ahmednagar,latest News In Divya Marathi

पंकजांच्या सभेने पिचडांपुढे आव्हान, भावनिक आवाहनाला जनतेचा प्रतिसाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले- आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी सोमवारी (6 ऑक्टोबर) भाजपचे उमेदवार अशोक भांगरे यांच्यासाठी घेतलेली सभा जनमानसाचा ठाव घेणारी ठरली. बाजारतळावर यापूर्वी अनेकांच्या सभा झाल्या. शरद पवार, अजित पवार, नितीन गडकरी व प्रा. नितीन बानगुडे यांच्यापेक्षा पंकजा यांची सभा विक्रमी ठरली. अकोले मतदारसंघात संगमनेर तालुक्यातील पठारावरची काही गावे आहेत. या सभेत पठारावरील अनेक गावांतील कार्यकर्ते आल्याने भांगरे यांची ताकद वाढली. आढळा, मुळा, प्रवरा खोऱ्यासह आदिवासी भागातून सभेस मतदारांनी केलेली गर्दी राष्ट्रवादी व शिवसेनेला विचार करायला भाग पाडणारी ठरली. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आमदार मधुकर पिचड यांच्यासमोर इतर पक्षांच्या उमेदवारांचा निभाव लागणार नाही, अशी स्थिती होती. मात्र, स्वतः पिचड उमेदवार नाहीत. त्यांनी आपला मुलगा वैभवला रिंगणात उतरवल्याने यावेळी वातावरण नेहमीपेक्षा वेगळे आहे. मतदार उमेदवारांची तुलना करू लागले आहेत. शिवसेनेचे मधुकर तळपाडे जिल्हा पोलिस अधीक्षकपदी राहिलेले अधिकारी आहेत. प्रत्येक वेळी नवीन पक्षाची टोपी परिधान करणारे भांगरे भाजपकडून उभे आहेत. काँग्रेसने सतीश भांगरे हा नवीन चेहरा दिला, तर माकपने ही आपला सर्वसामान्य कार्यकर्ता नामदेव भांगरे यांना निवडणुकीत उतरवले. भांगरे यांच्यासाठी आलेले गडकरी, पंकजा मुंडे व शिवसेनेसाठी प्रा. बानगुडे वगळता कोणीही मोठा नेता तालुक्यात आलेला नाही. माजी मंत्री पिचड यांच्याही मुलाच्या प्रचारासाठी कोणीही स्टार प्रचारकाची सभा झाली नाही. त्यांना स्वतःला राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. मात्र, ते स्टार प्रचारक होऊ शकले नाहीत. त्यामुळे आजही ते स्वतःच्या निवडणुकीप्रमाणे मुलाच्या प्रचारासाठी अकोल्यातच अडकून पडले आहेत. विरोधकांत फाटाफूट अकोल्यात शिवसेना फुटून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक भांगरेंबरोबर गेले. शिवाजी धुमाळसारखा कार्यकर्ता राष्ट्रवादीने गमावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या किसान सभेचे प्रदेक्षाध्यक्ष अ‍ॅड. वसंत मनकर यांनी भाजपत प्रवेश केला. काँग्रेसमध्ये अशीच अवस्था आहे. भाकप आज तरी माकपसोबत आहे. मात्र, शेवटपर्यंत ही साथ टिकेल की, विजयासाठी कोणाला हातभार लावण्यासाठी कारणीभूत ठरेल हे सांगता येत नाही. एकंदरीत मुंडेंच्या सभेमुळे मतदारसंघात भांगरे यांना पोषक वातावरण तयार झाले आहे.