आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pankaja Palve munde Attack On NCP , Congress In Nagar

सत्ताधार्‍यांची पैशांची मस्ती जिरवणार; आमदार पंकजा मुंडे यांचा निर्धार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - सरकारने सिंचनाचे 70 हजार कोटी खाल्ले. त्यांना सत्तेची, मसल पॉवरची आणि पैशांची मस्ती चढली आहे. त्यांना वाटते या जोरावर आम्ही निवडणूक जिंकू, पण हीच मस्ती आपल्याला उतरावयाची आहे, असे सुचवत भारतीय युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी युवावर्गाला निवडणुकीसाठी सज्ज होण्याचा आदेश दिला.

भाजयुमोचा निर्धार मेळावा रविवारी तुषार गार्डन येथे झाला. याप्रसंगी मुंडे बोलत होत्या. खासदार दिलीप गांधी, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले, उपमहापौर गीतांजली काळे, मनपा स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, सुवेंद्र गांधी आदी या वेळी उपस्थित होते.

पालवे म्हणाल्या, 1995 मध्ये सत्ता आणताना भाजपने जी इच्छाशक्ती निर्माण केली होती, तीच इच्छाशक्ती पुन्हा तयार करायची आहे. तुम्ही असे समजू नका की, आपल्याकडे मुद्दे नाहीत. या सरकारने आयते मुद्दे दिले आहेत. सरकारने केलेले घोटाळे चव्हाट्यावर आणण्यात आपण अपयशी ठरलो, तर जनता आपल्याला माफ करणार नाही. एकजूट संपते, तेव्हा पराभवाला सामोरे जावे लागते. लोक सरकारवर इतके वैतागले आहेत की, आता आपल्याला मते फेकून मारतील, पण देव लागला द्यायला अन् पदर नाही घ्यायला अशी अवस्था व्हायला नको. सत्ताधार्‍यांनी 70 हजार कोटी सिंचनाच्या नावाखाली खाल्ले. त्यांना वाटते निवडणुका आम्ही पैशांच्या व गुंडांच्या जोरावर जिंकू, पण तीच मस्ती आपल्याला उतरावयाची आहे.

शिवशाहीत जीवनावश्यक गोष्टींचे दर स्थिर होते, पण काँग्रेसचे सरकार आल्यावर मोठय़ा प्रमाणात महागाई वाढली. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, प्रवेशप्रक्रियेसाठी आवश्यक दाखले मिळत नाहीत. हा विद्यार्थ्यांचा नव्हे, तर तुमच्या अधिकार्‍यांचा दोष आहे, अशी खरमरीत टीका मुंडे यांनी केली.

कर्डिले म्हणाले, सत्ता परिवर्तन अटळ आहे. जनतेने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सत्तेचा अनुभव घेतला. सत्तेवर असताना त्यांना जनतेची आठवण आली नाही, पण निवडणुका तोंडावर आल्यानंतर स्वस्त धान्यासाठी अन्नसुरक्षा विधेयक मांडले गेले, पण त्याला भुलू नका. ते निवडून आले, तर पुन्हा स्वस्त धान्य मिळणार नाही.

नियमबाह्य 50 कोटी

कर्जत तालुक्यातील जगदंबा (अंबालिका) साखर कारखाना सत्ताधार्‍यांनी विकत घेतला. या कारखान्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी नियम धाब्यावर बसवून 50 कोटी खर्च करण्यात आल्याचा मुद्दा सुवेंद्र गांधी यांनी मांडला. यावर पालवे यांनी नियमबाह्य खर्चाविषयी विधानसभेत सरकारला जाब विचारणार आहे, असे आमदार मुंडे यांनी सांगितले.

कर्डिलेंना कोपरखळी

निवडणुकांसाठी सर्वात कमी खर्च आमदार राम शिंदे यांना आला. मलाही निवडणुकीसाठी फारसा खर्च आला नाही, पण आमदार शिवाजी कर्डिले यांना जास्त खर्च आला. मला मागील निवडणुकीपेक्षाही कमी खर्च येईल, कारण आता तुम्हीच आमच्याबरोबर आहात, अशी कोपरखळी खासदार दिलीप गांधी यांनी आमदार कर्डिले यांना मारली.

नगरच्या महापालिकेपासून विजयाची सुरुवात

ज्या तुळजाभवानीला स्मरून शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली होती, त्याच भवानीमातेपुढे प्रार्थना करून सुराज्य स्थापन करायचे आहे. नगरमहापालिकेच्या निवडणुकीसाठी येणार आहे. विजयाची सुरुवात नगरमहापालिकेपासून करूयात, असे मुंडे यांनी सांगितले.