आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅराग्लायडिंग क्रीडा प्रचारासाठीच्या मदतीचा चेंडू आता अध्यक्षांकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू अप्पासाहेब ढूस यांना प्रचार प्रसार करण्यासाठी एक लाखाची मदत देण्यास देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या स्थायी समितीने दोन वर्षांपूर्वी मंजुरी दिली होती.
मुख्याधिकारी विनोद जळक यांनी हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवला. त्यालाही मंजुरी मिळाली, पण धनादेश वितरणासाठीच्या मंजुरीसंदर्भातील रिपोर्टवर ही बाब समाविष्ट असल्याचे वाटत नसल्याचा शेरा देऊन मदत देण्याचा चेंडू अध्यक्षांकडे टोलवला. याप्रकरणी तेथील नागरिक सुरेश लोखंडे यांनी मुख्याधिकाऱ्यांविरोधात राहुरी पोलिसांकडे तक्रारअर्ज दिला आहे.
ढूस हे देवळालीप्रवरा येथील रहिवासी असून त्यांनी आतापर्यंत जुमरिंग, पॅरासेलिंग, पॅराग्लायडिंग, पाॅवर पॅराग्लायडिंग, पॅराजंपिंग आदी सात साहसी क्रीडाप्रकारांत प्रावीण्य मिळवले आहे. विमानातून १२ हजार फुटांवरून १२ वेळा उडी घेणारे ढूस हे पहिले भारतीय असून त्याची नोंद २००९ मध्ये लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. या खेळाचा राज्यभरात प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांना पॅरामोटर (पॉवर पॅराग्लायडर) साहित्य खरेदीसाठी सात लाखांची गरज आहे. याबाबत त्यांनी देवळाली प्रवरा नगरपालिकेकडे पाठपुरावा केला. स्थायी समितीने फेब्रुवारी २०१३ मध्ये लाखाची मदत देण्यास मंजुरी दिली. तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे ठरले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपालिका शाखेमार्फत एक लाखाची मदत करण्यास नगर परिषद, नगरपंचायत आैद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम ४९ (३) नुसार तीन अटींवर २५ जुलै २०१४ रोजी मंजुरी देण्यात आली. तोपर्यंत मुख्याधिकारी जळक यांनी कोणताही विरोध नोंदवला नाही. नगर परिषदेच्या आस्थापना विभागाने २० ऑगस्ट २०१४ रोजी आस्थापना नगर परिषदेच्या अध्यक्षांकडे धनादेश वितरणासाठी मंजुरी मिळण्याबाबत अहवाल सादर केला. त्यावर जळक यांनी ४९ (३) नुसार जत्रा, प्रदर्शन किंवा गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमासह सार्वजनिक समारंभात वरील बाब समाविष्ट असल्याचे वाटत नाही. त्यामुळे अध्यक्षांनी स्वत:च्या अधिकारांत निर्णय घ्यावा, असा शेरा लिहिला.
त्यामुळे सुरेश मुरलीधर लोखंडे यांनी राहुरी पोलिसात मुख्याधिकारी जळक यांनी पदाचा गैरवापर करून खोटी कागदपत्रे तयार करून शासनाचा वेळ पैसा खर्च करून फसवणूक केल्याची तक्रार केली आहे.

मदतीचा अंतिम निर्णय नगराध्यक्ष घेतील
ढूस यांची फाइल प्रोसेसमध्ये आहे. अंतिम निर्णय नगराध्यक्ष घेतील. ठरावाची अंमलबजावणी करण्याचे काम माझे आहे. मी ठरावाला विरोध करू शकत नाही. जेथे मत मांडायचे तेथे मांडले आहे. फाइल रिजेक्ट झालेली नाही. आर्थिक अधिकार अध्यक्षांचे आहेत, तेच अंतिम निर्णय घेतील.'' विनोदजळक, मुख्याधिकारी,देवळाली नगर परिषद
अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तक्रार
श्रीरामपूर,राहुरी, संगमनेर या नगरपालिकांनी ४९ (३) अधिनियमानुसार मला मदत दिली आहे. पण विनोद जळक यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी देऊनही मदत देण्यासंदर्भात असा शेरा लिहून माझ्यावर अन्याय केला. कायद्यात तरतूद असतानाही त्यांनी मदत देण्यास नकार दिला आहे.'' अप्पासाहेबढूस, खेळाडू.