आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारगमन कराच्या वसुलीबाबत आज फैसला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पारगमन कराच्या वसुलीबाबत बुधवारी होणार्‍या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात येणार आहे. पदाधिकार्‍यांना विश्वासात न घेता पारगमन वसुलीला मुदतवाढ देणार्‍या प्रशासनावर सभेत नगरसेवकांकडून आगपाखड होण्याची चिन्हे आहेत. विषयपत्रिकेत नसलेल्या विषयांवरही वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील महिलेच्या मृत्यूप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांना धारेवर धरण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.
महापालिका हद्दीतील जकात 1 जुलैपासून बंद झाल्याने पारगमन वसुलीचा तिढा निर्माण झाला आहे. स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने व कर्मचार्‍यांच्या कमतरतेमुळे पारगमन वसुली जकात ठेकेदार विपुल ऑक्ट्रॉय सेंटर या संस्थेकडेच ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, या निर्णयास पदाधिकारी व काही नगरसेवकांनी विरोध केला आहे. प्रशासनाने पदाधिकार्‍यांना अंधारात ठेवून पारगमन वसुलीची परवानगी दिली, त्याचबरोबर परवानगी देण्यासाठी मोठय़ा प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण झाली असा आरोप उपमहापौर गीतांजली काळे यांनी केला होता. पारगमन वसुलीबाबत निर्णय घेण्यासाठी तातडीने सर्वसाधारण सभा घेण्यात यावी, अशी मागणी 34 नगरसेवकांनी महापौर शीला शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसार नगरसचिव विभागाने सभेचा प्रस्ताव सादर केला होता. त्यास महापौर शिंदे यांनी मंजुरी देऊन बुधवारी सभा घेण्याचे निश्चित केले.
पदाधिकारी व नगरसेवकांच्या आरोपामुळे पारगमनचा वाद चिघळला आहे. पारगमन वसुलीसाठी नव्याने निविदा काढण्याच्या निर्णयावर सभेत एकमत होण्याची शक्यता असली, तरी त्यापूर्वी प्रशासनावर नगरसेवकांकडून आगपाखड करण्यात येणार आहे. विषयपत्रिकेत नसलेल्या विषयांवरही वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.