आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parallel And Pipeline Extended, Latest News In Divya Marathi

केडगावला मिळणार पुरेशा दाबाने पाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- केडगाव उपनगरातील नागरिकांना आता समान व पुरेशा दाबाने पाणी मिळणार आहे. समांतर व विस्तारित पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू झाले असून येथील पाणीप्रश्न लवकरच सुटेल, अशी माहिती उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी गुरुवारी दिली. केडगाव पाणीपुरवठा योजनेंतर्गत समांतर व विस्तारित पाइपलाइन टाकण्याच्या कामाचा प्रारंभ कोतकर यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी नगरसेविका सविता कराळे, सुनीता कांबळे, नगरसेवक सुनील कोतकर, सामाजिक कार्यकर्त्या शकुंतला पवार, गणेश सातपुते, प्रभाग अभियंता विलास सोनटक्के आदी उपस्थित होते. कोतकर म्हणाल्या, यूआयडीएसएसएमटी अंतर्गत हाती घेतलेल्या केडगाव पाणी योजनेचे (फेज 1) काम अंतिम टप्प्यात आहे. योजनेचे पीएमसी म्हणून काम पाहणाया महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाने केलेल्या सर्व्हेत मुख्य जलवाहिनी धरण्यात आली होती. परंतु या सर्व्हेत उपवाहिनीचे 15 किलोमीटरचे काम धरण्यात आले नव्हते. त्यामुळे एकनाथनगर, शिवाजीनगर, शाहूनगर, ओंकारनगर, मोहिनीनगर, उदयनराजेनगर, भूषणनगर, दूधसागर सोसायटी, शास्त्रीनगर, लोंढे मळा, जपेनगर आदी भागांतील नागरिक योजनेपासून वंचित राहणार होते. ही बाब लक्षात आल्यानंतर सातत्याने पाठपुरावा करून समांतर व विस्तारित पाइपलाइन टाकण्याबाबत पुन्हा सर्व्हे करण्यात आला. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या मंजुरीनंतर पाइप खरेदी करण्यात आली. आता प्रत्यक्षात समांतर पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे जो भाग योजनेपासून वंचित राहिला होता, त्या भागाला मोठा फायदा होणार असल्याचे कोतकर यांनी सांगितले.
नवीन सर्व्हेनुसार टाकण्यात येणारी समांतर व विस्तारित पाइपलाइन शंभर ते दीडशे एम. एम. व्यासाची आहे. सुमारे 15 किलोमीटर अंतरावर ही पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना समान व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नवीन उभारण्यात येणाया वसाहती योजनेपासून वंचित राहणार नाहीत, याची देखील काळजी घेण्यात आली आहे. लवकरच या नवीन पाइपलाइनवरून नळजोड देण्यात येणार आहेत. त्यामुळे केडगावचा पाणीप्रश्न सुटणार असल्याचे कोतकर यांनी सांगितले.

‘फेज टू’ बाबत दक्ष रहा

केडगाव पाणी योजनेप्रमाणे शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेत (फेज टू) त्रुटी राहणार नाहीत, याची संबंधित अधिका-यांनी काळजी घ्यावी. वंचित भागाचा पुन्हा सर्व्हे करणे, प्रस्ताव तयार करून त्यास मंजुरी घेणे, या प्रक्रियेत वेळ जात असल्याने योजनेच्या कामाला गती मिळत नाही. त्यामुळे ‘फेज टू च्या कामाबाबत संबंधित अधिकायांनी दक्ष राहावे, अशा सूचना कोतकर यांनी दिल्या.