आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पारधी समाजातील युवकांना मिळणार ‘जॉब कार्ड’, वर्षभरात नोकरी मिळवून देण्‍याचे प्रयत्‍न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नाशिक,जळगाव, धुळे, नंदुरबार नगरमधील पारधी समाजाच्या युवकांसाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने नोकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. पोलिसांच्या मुलांनाही या मेळाव्याचा लाभ घेता येईल. न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी (२६ नोव्हेंबर) सकाळी वाजता मेळाव्यास सुरूवात होईल. पुणे इतर ठिकाणच्या ५० मल्टीनॅशनल कंपन्यांचे अधिकारी मुलाखती घेतील. मेळाव्यात सहभागी सर्वांना एका वर्षासाठी मोफत जॉब कार्ड देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

गुन्हेगारी जात असा शिक्का बसलेल्या पारधी युवकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक शर्मा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यात पोलिसांच्या मुलांनाही सहभागी होता येईल. सुमारे तीन हजार युवक या मेळाव्यात सहभागी होतील, असे नियोजन आहे. पुणे येथील जॉब शोकेसच्या माध्यमातून हा मेळावा होत आहे. सुमारे दोन हजार पोलिसांची मुले, तर पारधी समाजातील सुमारे एक हजार युवक सहभागी होतील, असा अंदाज आहे.

 

शेवगाव श्रीगोंदे येथे झालेल्या नोकरी मेळाव्यात पारधी समाजातील ७५० युवकांनी नोंदणी केली आहे. न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या मेळाव्यात केवळ नाशिक परिक्षेत्रच नव्हे, तर राज्यभरातील पोलिस पारधी समाजातील मुलांना सहभागी होता येणार आहे. सहभागी सर्व युवकांना वर्षभरासाठी एक जॉब कार्ड मोफत देण्यात येणार आहे. ज्या युवकांना नोकरी मेळाव्यात नोकरी मिळणार नाही, अशांना या कार्डच्या माध्यमातून वर्षभर नोकरीचा शोध घेता येणार आहे. त्यासाठी पुणे येथील जॉब शोकेस मदत करणार आहे. विशेष म्हणजे पदव्युत्तर पदवी ते थेट पाचवीपर्यंतचे शिक्षण असलेल्यांनाही या मेळाव्याच्या माध्यमातून नोकरी देण्याचा प्रयत्न आहे.

 

नाशिक परिक्षेत्राबाहेरील पोलिसांच्या मुलांनी या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आपल्या आई- वडिलांच्या ओळखपत्राची प्रत देणे आवश्यक आहे. पारधी समाजाच्या मुलांनाही आपले ओळखपत्र द्यावे लागणार आहे. जास्तीत जास्त मुलांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक शर्मा यांनी केले आहे.

 

असे आहे जॉब कार्ड
मेळाव्यात सहभागी युवकांना मोफत देण्यात येणारे जॉब कार्ड आधार कार्डसारखे असेल. कार्डवर एक नंबर असेल. त्यावर एसएमएस केल्यावर लिंक ओपन होईल. या लिंकवर बायोडाटा द्यायचा, जॉब कार्ड नंबर टाकायचा. पुणे येथील जॉब शोकेसला ही माहिती जाईल. संबंधिताला त्याच्या योग्यतेनुसार विविध कंपन्यांमध्ये वर्षभरात नोकरी मिळून जाईल.

 

समाजात चांगली मुले
पारधी समाजावर गुन्हेगारीचा ठपका बसला आहे, परंतु या समाजात अनेक चांगली मुले आहेत. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा मेळावा आहे. नोकरी मिळाली, तर पारधी समाजातील इतर मुलांना प्रोत्साहन मिळेल. ते देखील गुन्हेगारी सोडून नोकरी करतील. त्यातूनच गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल.
- रंजनकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक.

 

बातम्या आणखी आहेत...