आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्किंग व्यवस्थेचा उडाला बोजवारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी आवश्यक असलेल्या वाहनतळांचे कोणतेही सुयोग्य नियोजन शहरात केले गेले नाही. त्यामुळे वाहन पार्किंगची समस्या दिवसेंदिवस अधिकच जटिल होत चालली आहे. पार्किंगची समस्या सोडवण्याविषयी वाहतूक पोलिस, महापालिका व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उदासीन आहे.

नगर शहराची लोकसंख्या ज्या गतीने वाढत आहे, तेवढय़ाच वेगाने वाहनांची संख्याही वाढते आहे. सध्या शहराची लोकसंख्या साडेचार लाख असून वाहनसंख्याही लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यात नव्याने भर पडतच आहे. या वाहनांमुळे शहरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी व प्रदूषणाची समस्या हाताबाहेर चालली आहे. वाहन पार्किंगच्या समस्येनेही गंभीर स्वरूप धारण केले आहे.

सार्वजनिक ठिकाणी व राहत्या घराच्या आवारात पार्किंग आवश्यक असते. महापालिकेच्या बेजबाबदार धोरणामुळे व प्रशासनाच्या अनास्थेमुळे सार्वजनिक ठिकाणच्या पार्किंगचा बट्टय़ाबोळ उडाला आहे. एखाद-दोन अपवाद सोडले, तर शहरात सुनियोजित पार्किंग कुठेच नाही. त्यामुळे रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी केली जातात. मुळातच वाहतुकीसाठी अपुरे पडणारे रस्ते आणखी अरुंद होऊन वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यात वेळ, इंधन आणि पैशांचाही अपव्यय होतो.

लाखो रुपये मोजूनही सोसायटीच्या आवारात ‘पार्किंग स्पेस’ मिळत नाही. रस्त्यावरच वाहने लावल्याने अनेकदा खटके उडतात. वाहनांच्या टायरमधील हवा सोडण्याचे प्रकार होत असून त्यामुळे भांडणाचे पर्यावसान हाणामारीपर्यंत जाते. मंगल कार्यालये, सभागृहे अशा ठिकाणी होणार्‍या पार्किंगची सोय असायला हवी. परंतु बहुतांश हॉटेल व मंगल कार्यालयांना पुरेसे पार्किंगच नाही.

ग्रामीण भागातून शहरात येणारे नागरिक आपली वाहने बसस्थानकावरील वाहनतळावर लावतात. तेथून वाहनांचे स्पेअर पार्ट व इंधन चोरीला जाते अशा तक्रारी आहेत. वाहनांची वाढलेली संख्या, अपुरे रस्ते, रस्त्यावर होणारे बेकायदा पार्किंंग यामुळे बरेच गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. भविष्यात ही समस्या अधिक गंभीर बनणार आहे. महापालिकेने आताच वाहनतळ विकसित करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मनपाची अनास्थाच कारणीभूत
पार्किंगच्या समस्येवर मात करण्यासाठी चितळे रोडवर जुन्या जिल्हा सरकारी रुग्णालय परिसरात सार्वजनिक वाहनतळ उभारण्याचा महापालिकेचा प्रस्ताव होता. पण या प्रस्तावाला जिल्हा रुग्णालयाने नकार दिला. मनपाने पार्किंगसाठी एकही भूखंड आरक्षित केलेला नाही. त्यामुळे शहरातील पार्किंग समस्येला मनपाची अनास्थाच कारणीभूत असल्याचे स्पष्ट दिसते.