आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारनेरकरांची नाराजी पालकमंत्र्यांवर नाही; अंकुश काकडे यांची सारवासारव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- पारनेरमधील कार्यकर्त्यांनी त्यांच्या मनात असलेली खदखद व्यक्त केली. त्यांची नाराजी पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्याबाबत नाही. स्थानिक राजकारण व प्रशासनाच्या कारभारावर कार्यकर्ते नाराज होते. पक्षावरील नाराजी दूर झाली असून त्यांनी राजीनामे मागे घेतले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांनी रविवारी दिली.

राष्ट्रवादीच्या पारनेर येथील कार्यकर्त्यांसह काही प्रमुख पदाधिकार्‍यांनी पालकमंत्र्यांकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करून मागील आठवड्यात राजीनामे दिले होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील ही नाराजी योग्य नसल्याने काकडे यांच्या उपस्थितीत रविवारी पक्ष कार्यालयात समन्वय बैठक झाली. बैठकीनंतर काकडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे, शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप, विक्रम पाचपुते, किसनराव लोटके आदी या वेळी उपस्थित होते.

काकडे म्हणाले, पाचपुतेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी खदखद व्यक्त केली. पारनेर तालुक्यात शिवसेनेला राष्ट्रवादीच्याच मेहेरबानीमुळे सभापतिपद मिळाले आहे. आमदारही त्यांच्याच पक्षाचे आहेत. त्यामुळे कार्यकर्ते नाराज होते. पालकमंत्री राष्ट्रवादीचे असले, तरी काँग्रेसकडे महसूल व कृषी ही मंत्रिपदे आहेत. स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर कार्यकर्ते नाराज आहेत. पाचपुते यांनी पारनेरमध्ये दौरे काढले, बैठका घेतल्या, पण कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर कधीही नाराजी व्यक्त केली नाही.

सांगताही येत नाही, सहनही होत नाही..
बैठकीत विश्वनाथ कोरडे बोलण्यासाठी उठल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला. संबंधिताने पक्षात प्रवेश करूनच बोलावे, असे काही जण म्हणाले. त्यामुळे गोंधळ सुरू झाला. नंतर सुजित झावरे म्हणाले, जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्या गावात पाणी आहे, पण आम्हाला पाण्याचा थेंब नाही. हा विरोधाभास नाही का ? जिल्हा नियोजन समितीकडून मदत मिळत नाही. विधानसभेला तिकीट कुणालाही द्या, आम्ही प्रामाणिकपणे काम करू, पण पक्षातील कार्यकर्त्यांना डावलून इतरांना जवळ करण्याचा प्रकार सांगताही येत नाही अन् सहनही होत नाही.. '

राजीनामे मागे घेतलेले नाहीत..
आम्ही टोकाला जाऊन विरोध करणारे नाही. आमची कैफियत आम्हाला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्यासमोर मांडायची आहे. राजीनामा नाकारण्यात आम्हाला स्वारस्य नाही, मात्र आमचे म्हणणे मुंबईपर्यंत जाणे आवश्यक आहे. राजीनामे देण्याचा निर्णय हा प्रक्षोभ कार्यकर्त्यांचा होता. आम्ही अद्याप राजीनामे मागे घेतलेले नाहीत. मुंबईतील बैठकीनंतर भूमिका स्पष्ट करू.’’ सुजित झावरे, जिल्हा परिषद सदस्य

अडीच वर्षांनंतर पाहू..
राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची युती आहे. स्थानिक पातळीवर जिल्हा परिषदेत पर्याय नसल्यामुळे शिवसेना व भाजपला दोन पदे देण्यात आली. कार्यकर्त्यांनी युती तोडण्याबाबतही भावना व्यक्त केल्या. मात्र, याबाबत अडीच वर्षांनंतर ठरवता येईल, असे काकडे म्हणाले.