आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा दिवसांपासून ढोकीच्या छावणीतील जनावरे उपाशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - तालुक्यातील ढोकी येथे सावली प्रतिष्ठानच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या जनावरांच्या छावणीत सहा दिवसांपासून जनावरांना चाराच दिला गेला नसल्याची गंभीर तक्रार तेथील शेतकर्‍यांनी तहसीलदार जयसिंग वळवी यांना गुरुवारी केली. महिनाभरात केवळ चारच दिवस पशुखाद्य देऊन तेथेही छावणीचालकांनी जनावरांची घोर उपेक्षा केल्याचे गार्‍हाणे शेतकर्‍यांनी तहसीलदारांकडे मांडले.

टाकळी ढोकेश्वर परिसरातील जनावरांसाठी टाकळीच्या सावली प्रतिष्ठानने 18 मे रोजी ढोकी येथे छावणी सुरू केली. त्यानंतर परिसरातील शेकडो जनावरे या छावणीमध्ये दाखल झाली. छावणीतील प्रत्येक जनावरास दररोज एक किलो पशुखाद्य तसेच मिनरल्स देण्याचे बंधन होते. छावणीचालकांनी मात्र हात आखडता घेत महिनाभरात केवळ चारच दिवस पशुखाद्य देऊन जनावरांच्या कुपोषणाला आमंत्रणच दिले आहे. चार्‍याच्या टंचाईमुळे जनावरांना मोठय़ा प्रमाणावर उसाचाच चारा म्हणून वापर करावा लागतो. त्यामुळे जनावरांमध्ये आवश्यक प्रथिनांची कमतरता निर्माण होऊन ते कुपोषित होऊ नयेत यासाठी त्यांना मिनरल्स देण्याचेही बंधन होते. शासनाच्या पथकाने या छावणीची पाहणी केली. त्यावेळी मिनरल्सचे पाकीटच पथकाने पाहिले नसल्याची तक्रार त्यावेळी शेतकर्‍यांकडून करण्यात आली होती.

ही छावणी बंद करण्याचा निर्णय सावली प्रतिष्ठानने घेतला आहे. परंतु ही छावणी सुरू ठेवण्याची मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे. रावसाहेब धरम, पांडुरंग चितळकर, बापू नर्‍हे, बाबासाहेब नर्‍हे, सगाजी मोरे, भास्कर खटके, भिमा धरम यांच्यासह पन्नास शेतकर्‍यांनी तहसीलदार वळवी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.

कोणत्याही परिस्थितीत छावणी बंद करू नका, असे आर्जव या वेळी शेतकर्‍यांनी तहसीदारांकडे केले. छावणी बंद झाली, तरी तेथील जनावरे इतर छावणीत स्थलांतरित करण्याचा पर्याय तहसीलदार वळवी यांनी मांडला. मात्र, परिसरात जवळ कोठेही छावणी नसल्याने तेथेच छावणी सुरू ठेवा, असा आग्रह धरण्यात आला. या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन वळवी यांनी दिले. दरम्यान, या संदर्भात सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब खिलारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाइलवर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.


छावणीचालकाचे दुर्लक्ष
सावली प्रतिष्ठानने छावणी सुरू केल्यापासून जनावरांची काळजी घेण्यात अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचे या तक्रारींमुळे उघड झाले. मागील सहा दिवसांपासून छावणीचालकांनी चार्‍याचा पुरवठाही बंद केल्याने जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चारा बंद झाल्याने शेकडो जनावरे उपाशी रहात आहेत.