आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीगोंद्याला पारनेर जोडण्यास विरोध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पारनेरला नगर सोयीचे असताना पारनेर तालुका हा श्रीगोंदे उपविभागीय कार्यालयाला जोडण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्वपक्षीय भूमिपुत्रांची मोट बांधून या निर्णयाला विरोध करू, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे यांनी दिली.
जिल्ह्यातील महसूल उपविभागांची पुनर्रचना करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सध्या जिल्ह्यात संगमनेर, श्रीरामपूर, नगर व कर्जत हे उपविभाग आहेत. या कार्यालयांमार्फत दोन ते तीन तालुक्यांचे महसुली काम पाहिले जाते. अतिरिक्त ताण कमी करून कामात गतिमानता येण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत होत आहे.
सध्या नगर उपविभागीय कार्यालयाला जोडलेल्या पारनेर तालुक्याला श्रीगोंदे उपविभागीय कार्यालयाशी जोडण्यात येणार आहे. पारनेर तालुक्याने या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. याबाबत झावरे म्हणाले, पारनेर तालुका क्षेत्रफळाने मोठा असून या तालुक्याच्या शेजारी नगर, संगमनेर, राहुरी, श्रीगोंदा व शिरूर हे तालुके आहेत. या तालुक्याला नगर उपविभागीय कार्यालय जवळ व सोयीचे आहे. मात्र, पारनेर श्रीगोंद्याला जोडणे अन्यायकारक आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, रिपाइं, तसेच इतर पक्ष संघटनांना एकत्र घेऊन सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधण्यात येईल. पारनेरसाठी नगर कसे सोयीचे आहे हे पटवून दिले जाईल.