आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीसीटीव्हीच्या फुटेजवरून चोरीप्रकरणाचा शोध सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - येथील नागेश्वर मंदिरातील पार्वतीच्या शाळुंखेवरील चांदीचे आवरण चोरीप्रकरणी विविध ठिकाणचे सीसी टीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. काही संशयितांचाही शोध सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक मारुती मुळूक यांनी शनिवारी दिली़ चोरीच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या गाभार्‍यासह चार ठिकाणी सीसी टीव्ही बसवण्यात आले आहेत़

पारनेरच्या नागेश्वर मंदिरात 4 जुलै रोजी दुपारी चोरी झाली. चोरीनंतर झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत यापुढे असे प्रकार होऊ नयेत म्हणून उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला़ या पार्श्वभूमीवर शुकवारी दुपारी मंदिरात चार ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यातही आले आहेत़ चोरीस गेलेले आवरण पुन्हा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या बैठकीत सुमारे पन्नास हजार रुपये देणगीच्या स्वरूपात देण्याचे भाविकांनी जाहीर केले. शुक्रवारी सायंकाळी पुन्हा बैठक बोलवण्यात आली होती. सोमवारपर्यंत पार्वतीच्या शाळुंखेवर चांदीचे नवे आवरण बसवून मंदिर दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल़े या बैठकीस शहरातील सर्व नागरिकांना बोलावण्यात आले असून चांदीच्या आवरणासाठी ऐच्छिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

श्वानाने काढलेल्या मागाच्या मार्गावरील सीसी टीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज पोलिसांनी तपासण्यासाठी ताब्यात घेतले आहे. या मार्गावर शामली हॉटेल, पारनेर ग्रामीण पतसंस्थेने रस्त्याच्या दिशेने कॅमेरे लावलेले आहेत. या कॅमेर्‍यांचे फुटेज तपासून त्यात कोणी संशयित आढळून येतो का, याची सुक्ष्मपणे तपासणी सुरू आहे. अशा प्रकारच्या चोर्‍या करणार्‍या संशयितांचा शोध घेण्यात येत असून या गुन्ह्यातील आरोपींना लवकरच जेरबंद करण्यात येईल, असे विश्वास मुळूक यांनी सांगितले.