आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोडेखोरांचा टोळीप्रमुख परश्या गजाआड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरसह बीड जिल्ह्यात दरोडे टाकणाऱ्या टोळ्यांचा प्रमुख परश्या ऊर्फ परसिंग हरसिंग भोसले (वय २२, बाभुळखेडा, ता. नेवासे) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी पांढरी पूल शिवारात मिरी रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. परश्याविरुद्ध नगरसह, बीड इतर काही जिल्ह्यांमध्ये दरोड्याच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्याकडे एक चोरीची दुचाकीही सापडली.

गुन्हे शाखेचे निरीक्षक पाटोळे यांच्या पथकातील उपनिरीक्षक राजकुमार हिंगोले, हेड कॉन्स्टेबल मधुकर शिंदे, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, विशाल अमृते, सागर सुलाने, नामदेव जाधव, बबन बेरड यांनी पांढरीपूल शिवारात मिरी रस्त्यावर परश्याला पकडले. त्याची चौकशी केल्यानंतर सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दरोड्याच्या गुन्ह्यांची कबुली दिली.
परश्याच्या ताब्यातील हिरो होंडा पॅशन मोटारसायकल त्याने पंधरा-वीस दिवसांपूर्वी बेलवंडी बेगर येथून चोरल्याची कबुली दिली. ही दुचाकी चोरताना त्याच्याबरोबर पारनेर तालुक्यातील साथीदार होता. पाथर्डी तालुक्यातील मोहोज खुर्द या गावामध्ये दरोडा टाकल्याची कबुलीही त्याने दिली. घरातील लोकांना चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने चोरल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
काही दिवसांपूर्वी नगर तालुक्यातील शिराढोण शिवारात धारदार शस्त्राचा धाक दाखवून, घरातील दोन व्यक्तींना मारहाण करुन रोकड, सोन्याचे दागिने मोबाइल हँडसेट त्याने चोरले होते. याशिवाय पाथर्डी, नगर तालुका, नेवासे श्रीगोंदे तालुक्यातही त्याने काही ठिकाणी अशाच स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.

नगर तालुका पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात त्याला सध्या अटक केली आहे. अधिक तपासाकरिता त्याला नगर तालुका पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...